टेक-इन्फो : तंत्रज्ञान स्वातंत्र्यातले भान

टेक-इन्फो : तंत्रज्ञान स्वातंत्र्यातले भान
Published on
Updated on

तंत्रज्ञानाने भारतात केलेली घोडदौड लाखो भारतीय नागरिकांचे स्वातंत्र्य समृद्ध करणारी ठरली आहे. विशेषतः भारतातल्या तरुणाईला बळ देण्याचे आणि तिच्यापुढे प्रगतीची नवी स्वप्ने, आशा-आकांक्षा ठेवण्याचे काम याच तंत्रज्ञानाने केले आहे. मात्र तंत्रज्ञानाने दिलेले स्वातंत्र्य जपण्यासाठी जबाबदार डिजिटल नागरिक म्हणून आपण कर्तव्ये बजावली पाहिजेत, तरच स्वातंत्र्य अबाधित राहील आणि अधिकाधिक समृद्धही होईल.

स्वातंत्र्य ही एका दिवसात मिळालेली गोष्ट नसते. तिच्यामागे मोठा संघर्ष असतो. हजारो घटनांच्या परिणामांचे फलित म्हणून स्वातंत्र्य देशाच्या वाट्याला येते. ते मिळण्याच्या प्रकियेत असलेला सार्वत्रिक सहभाग महत्त्वाचा असतोच; पण तितकीच महत्त्वाची असते ती म्हणजे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते टिकवून ठेवण्याची आणि अधिकाधिक समृद्ध करत नेण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेत जगाच्या पटलावर घडणार्‍या कित्येक घडामोडी, घटना आणि बदल अंतर्भूत असतात. त्यांच्या एकत्रित परिणामांनी स्वातंत्र्य अधिकाधिक बळकट होत जाते. भारत 1947 साली स्वतंत्र झाला असला, तरी देशभरातल्या आणि जगभरातल्या विविध घटनांनी भारताचे स्वातंत्र्य सर्वार्थाने उच्च दर्जाचे, समृद्ध करण्यासाठी आपापली भूमिका बजावली आहे.

1991 साली भारतात झालेल्या आर्थिक उदारीकरणाच्या निर्णयामुळे देशातले कोट्यवधी नागरिक दारिद्य्ररेषेच्या वर आले. एक प्रकारे त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाले. जगभरात गेल्या दोन दशकांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात अभूतपूर्व क्रांती घडून आली. या क्रांतीने मानवी जीवनावर खूप मोठा प्रभाव टाकला. अर्थात, भारतीय समाज आणि या समाजाची स्वातंत्र्य नावाची संकल्पना या परिणामांपासून दूर राहिलेली नाही. गेल्या 10 ते 15 वर्षांत तंत्रज्ञानाने भारतात केलेली घोडदौड लाखो भारतीय नागरिकांचे स्वातंत्र्य समृद्ध, सार्वत्रिक करणारी ठरली आहे.

या स्वातंत्र्याचे वेगवेगळे पैलू आहेत. त्यातला पहिला आणि महत्त्वाचा पैलू असा की, तंत्रज्ञानामुळे प्रत्येकाला आपापली ओळख प्रस्थापित करण्याचे आणि स्वतःच्या भावना मांडण्याचे स्वातंत्र्य मिळाले. या तंत्रज्ञानामुळे इंटरनेट घरोघरी पोहोचले आणि लोक आपल्या भावना, आपली भूमिका अनेक उपलब्ध माध्यमांवरून व्यक्त करू लागले. ही सुरुवात 'ऑर्कुट' नावाच्या त्या काळी उपलब्ध असणार्‍या माध्यामावरून झाली. नंतर फेसबुक, ट्विटर अशी कित्येक नवनवीन माध्यमे आली. आज एखादी व्यक्ती तिच्या गावात, घरात किंवा भोवतालच्या समाजात आपले म्हणणे मांडू शकत नसेल, तरी तिची बाजू सोशल मीडियावर मांडताना तिला कोणतीही अडचण येत नाही. सोशल मीडिया कोणत्याही आधारावर व्यक्तींमध्ये भेदभाव करत नाही. ज्याप्रमाणे लोकशाहीत प्रत्येक मताचे मूल्य समान असते, एखादी व्यक्ती कोणत्या जातीची, वर्गाची आहे याचा विचार न करता त्याच्या मताला महत्त्व दिले जाते, त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही प्रत्येक व्यक्ती समान असते. त्यामुळे सोशल मीडियावर कोणत्याही संपादकीय अडथळ्याशिवाय, सेन्सॉरशिपशिवाय, बंधनाशिवाय लोक स्वतःची ओळख निर्माण करू लागले. आपली मते मांडू लागले. पूर्वी मते मांडण्याचा अधिकार, किंबहुना मक्तेदारी एका ठराविक वर्गाकडे होती किंवा ठराविक वर्गाच्या हातात साधनांच्या चाव्या होत्या. तंत्रज्ञानाच्या या जगात असे कोणतेही बंधन लोकांवर नाही. यातून जगभरातल्या समान विषयांवर व्यक्त होणार्‍या, समान आवडीनिवडी असणार्‍या वर्गाशी संपर्क साधून त्यांचा व्हर्च्युअल समूह, कम्युनिटीज तयार होऊ लागल्या.

प्रचलित व्यवस्थेच्या विरोधात केलेली ही एक प्रकारची बंडखोरी होती. त्या बंदिस्त व्यवस्थेपासून आम्ही स्वतंत्र आणि वेगळे आहोत, हे सांगणारे ते बंड होते. अगदी खर्‍याखुर्‍या जगातही या सोशल मीडियाने अनेक क्रांत्या घडवून आणल्या. इजिप्तसारख्या देशात लोक रस्त्यावर उतरले. भारतातही गेल्या दशकाच्या सुरुवातीला झालेल्या अण्णा हजारे यांच्या लोकपाल आंदोलनात फेसबुकसारख्या सोशल माध्यमाने मोठी भूमिका बजावली. LGBTG किंवा इतर असे अनेक वर्ग सोशल मीडियामुळे आपला आवाज समाजापर्यंत पोहोचवू शकले. हे सगळे समजून घेतल्यास लक्षात येईल की, तंत्रज्ञानामुळे व्यक्तीला व्यक्ती म्हणून समाजासमोर उभे राहण्याचे स्वातंत्र्य गेल्या दोन दशकांत भारतात मिळाले.

तंत्रज्ञानाने दिलेले दुसरे स्वातंत्र्य म्हणजे संधीचे स्वातंत्र्य. एखादी वस्तू आपल्याला कुठूनही खरेदी करायची असेल, तर त्यासाठीच्या सेवा तंत्रज्ञानामुळे अत्यंत कमी किमतीत उपलब्ध झाल्या. एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जायचे असेल, तर त्याचे विविध मार्ग एकाच वेळी उपलब्ध झाले. एक गोष्ट घरबसल्या 10 ठिकाणांहून तुलना करून विकत घेण्याची सुविधा उपलब्ध झाली. विशेषतः 2015-16 साली भारतात 4G सेवा सुरू झाल्यानंतर गावोगावी पोहोचलेल्या इंटरनेट जोडणीमुळे नोकरी, व्यवसाय या सगळ्यांबद्दलच्या संधी एखाद्या खेडेगावात राहणार्‍या तरुणापासून ते पुण्या-मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये राहणार्‍या तरुणांनाही समानपणे उपलब्ध झाल्या. एखाद्या व्यक्तीमध्ये जर क्षमता असेल, तर त्या व्यक्तीला मिळणारी संधी कुणीच हिरावून घेऊ शकत नाही, हे नवे सत्य सोशल मीडियामुळे आणि तंत्रज्ञानामुळे गेल्या दशकात अधोरेखित झाले.

अवघ्या 10 हजार रुपये किंवा त्याहून कमी किमतीमध्ये उपलब्ध झालेले स्मार्टफोन्स आणि जगातले सर्वात स्वस्त इंटरनेट कनेक्शन, दोन गोष्टींचा त्यात प्रामुख्याने सहभाग होता. त्यामुळे वस्तूंच्या खरेदीपासून नोकरी व्यवसायापर्यंत समाजातील सर्व वर्गांना संधी मिळू लागली. याचे आपल्या जवळचे उदाहरण म्हणजे, कित्येक महिला आपल्या हातातली कला वापरून वेगवेगळ्या वस्तू बनवून त्या व्हॉट्स अ‍ॅपसारख्या साधनाचा वापर करून विकू लागल्या. आपल्या समान वयाच्या महिलांशी संपर्कात राहू लागल्या, त्यांच्याशी बोलू लागल्या. आज फक्त महिलांनी स्वतंत्रपणे चालवलेले लघू आणि मध्यम उद्योग, हे व्हॉट्स अ‍ॅप आणि इन्स्टाग्रामसारखी माध्यमे वापरून जोरात चालत आहेत. ही नवी अर्थव्यवस्थाच तंत्रज्ञानाने तयार केली आहे. जो महिला वर्ग एरवी वर्कफोर्समध्ये सहभागी होऊ शकला नसता, त्याला अत्यंत उत्तम गतीने अर्थव्यवस्थेत सहभागी करून घेण्याचे काम तंत्रज्ञानाने केले. एक प्रकारे महिलांना स्वतःची स्वप्ने जगण्याचे स्वातंत्र्य मिळवून दिले.

तंत्रज्ञानाने दिलेले तिसरे महत्त्वाचे स्वातंत्र्य म्हणजे अर्थातच शिकण्याचे स्वातंत्र्य! पूर्वीच्या काळी शिक्षण प्रत्येकापर्यंत पोहोचत नसे. त्याला अनेक मर्यादा होत्या. आता जगभरात उपलब्ध असणारे ज्ञान तंत्रज्ञानाने आपल्या स्मार्टफोनमध्ये उपलब्ध करून दिले आहे. रूढार्थाने ती व्यक्ती गरीब किंवा श्रीमंत आहे, कोणत्या जातीची आहे याचाही सोशल मीडियावर काही उल्लेख होत नाही. युट्यूबसारखे माध्यम वापरून कोणतीही व्यक्ती आपल्याला हवे ते, हवे तसे हव्या त्या वेगाने शिकू शकते. कोर्सेरा, अनअ‍ॅकॅडमी, उडेमी यांसारख्या ऑनलाईन माध्यमांनी शेकडो कोर्स आपल्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिले आहेत. ते अगदी मोफत किंवा जवळपास सर्वांना परवडतील अशा किमतीत उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे ज्ञान घेण्यासाठी खूप जास्त पैसे मोजायला हवेत. ते नसतील तर शिक्षण अर्धवट राहते किंवा दुसर्‍या कोणत्यातरी कामात असल्यामुळे शिकता येत नाही. कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे शिकता येत नाही, हे सर्व समज तंत्रज्ञानाने कालबाह्य ठरवले.

हवे तेव्हा, अगदी वयाच्या पन्नाशीतही ऑक्सफर्डसारख्या मोठ्या विद्यापीठातल्या शिक्षकाकडून अगदी कमी पैशात आपण हवे ते शिकू शकतो. आपण कोणत्या महाविद्यालयात शिकलो, कोणत्या शाखेची पदवी घेतली, या सगळ्याचा विचारही येथे केला जात नाही. परिणामी चौकटीबाहेरचा विचार करण्याला तंत्रज्ञानामुळे बळ मिळाले.

एकुणातच अभिव्यक्तीचे, विचार मांडण्याचे, खरेदी-विक्रीचे आणि शिक्षणाचे स्वातंत्र्य मिळाल्याने भारतातील स्वातंत्र्याची संकल्पना गेल्या दोन दशकांत अधिकाधिक समृद्ध होत गेली. विशेषतः आज भारतातल्या तरुणाईला बळ देण्याचे आणि तिच्यापुढे प्रगतीची नवी स्वप्ने, आशा-आकांक्षा ठेवण्याचे कामही याच तंत्रज्ञानाने केले आहे. भारतात 'यूपीआय'सारखी जागतिक दर्जाची यंत्रणा बनू शकली, हे याच कालावधीत घडले. म्हणजे एका अर्थाने, 'कर लो दुनिया मुठ्ठी मे', हे अस्सल भारतीय स्वप्न बघण्याचे स्वातंत्र्य आपल्याला या तंत्रज्ञानाने दिले आहे. अर्थात या स्वातंत्र्याचा उपभोग घेत असताना, आपण स्वैराचाराच्या दिशेने तर जात नाही ना, याचाही विचार करावा लागेल. अत्यंत कमी वेळात सोशल मीडियासारखे तंत्रज्ञान देशभर पोहोचल्यामुळे त्यावर चांगले काय आणि वाईट काय, त्यावर तयार झालेले फिल्टर बबल्स… या सगळ्यामुळे खरंच आपण स्वातंत्र्यात आहोत का? असा प्रश्न पडतो. व्हर्च्युअल जगातही वेगवेगळे समूह, अल्गोरिदममुळे तयार झालेले वेगवेगळे विश्व आणि त्यांच्यातला विसंवाद, यामुळे आपण पुन्हा एकदा मानसिक पारतंत्र्यात गेलो आहोत की काय, स्मार्टफोनच्या आहारी गेलो आहोत की काय, असा प्रश्नही पडू लागला आहे. तंत्रज्ञानाचे व्यसन आपल्याला मानसिकद़ृष्ट्या पारतंत्र्यात तर घेऊन जात नाही ना, असाही प्रश्न यानिमित्ताने तयार झाला आहे.

एकाच वेळी वेगवेगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य उपभोगत असताना या तंत्रज्ञान उपलब्ध करून देणार्‍या मोठ्या कंपन्यांच्या कह्यात आपण गेलो आहोत का? आपली माहिती, आपला डेटा या कंपन्यांच्या ताब्यात असताना, आपला स्वभाव काय आहे आणि आपण सध्या कोणता विचार करत आहोत, या सगळ्याचा अंदाज या कंपन्या लावत असतात. त्यानुसार त्या आपल्याला वेगवेगळ्या वस्तू, सेवा विकण्याचा प्रयत्न करतात. हे नव्या जगाचे नवे पारतंत्र्य तर नाही ना, असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. तंत्रज्ञानामुळे तयार झालेल्या या सगळ्या नव्या समस्या एका बाजूला असताना, दुसर्‍या बाजूला तंत्रज्ञानाने दिलेले स्वातंत्र्य हे अधिक मोलाचे आहे. ते जपण्यासाठी जबाबदार डिजिटल नागरिक म्हणून, नेटिझन्स म्हणून आपण आपली कर्तव्ये बजावली, तर तिथले स्वातंत्र्यही अबाधित राहील आणि अधिकाधिक समृद्ध होत राहील, यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news