

पुढारी ऑनलाईन डेस्क : लेगस्पिनर युजवेंद्र चहलचे (Yuzvendra Chahal) गेल्या काही काळापासून भारतीय संघातील स्थान निश्चित नाही. नुकतेच त्याची वेस्ट इंडिज दौऱ्यातील वनडे आणि एकदिवसीय मालिकेसाठी निवड झाली. पण तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत त्याला बेंचवर बसावे लागले. टी-20 मालिकेच्या पहिल्या सामन्यात तो प्लेईंग इलेव्हनचा भाग होता. त्याने महत्त्वाच्या दोन विकेट घेत यजमान संघाला धक्के दिले. असे असूनही त्याच्या नावावर एका नकोशा विक्रमाची नोंड झाली आहे.
टीम इंडियाच्या फिरकी मा-याची जबाबदारी सांभाळताना चहलने (Yuzvendra Chahal) चांगली सुरुवात केली. पहिल्याच षटकात त्याने विंडिजच्या दोन घातक फलंदाजांची शिकार केली. पहिल्या चेंडूवर विंडिजचा उपकर्णधार काईल मायर्सला तर तिसऱ्या चेंडूवर ब्रँडन किंगला पायचित पकडले. चहल मारा पाहून असे वाटले की तो यजमान संघावर मैदानावर वर्चस्व गाजवणार, पण तसे होऊ शकले नाही.
चहलच्या त्याच षटकात निकोलस पूरनने त्याला एक चौकार आणि एक षटकार ठोकत 10 धावा वसूल केल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकात त्याने फक्त 5 धावा दिल्या. मात्र, इथून पुढे भारतीय फिरकीपटूची लय खराब झाली. तिसऱ्या षटकात चहलने रोव्हमन पॉवेलकडून षटकार खाल्ला. या षटकात त्याने 8 धावा तर एकूण 3 षटकात 2 बळी घेत 24 धावा दिल्या. यादरम्यान त्याच्या गोलंदाजीवर दोन षटकार बसले. यासह चहलच्या नावावर एक नकोसा विक्रम नोंदवला गेला. युजीने आतापर्यंत 76 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 1674 चेंडू टाकले आहेत आणि एकूण 119 षटकार खाल्ले आहेत. तो आता आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वाधिक षटकार खाणारा दुसरा गोलंदाज बनला आहे. त्याने या बाबतीत इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशीदची बरोबरी केली आहे.
129 – ईश सोधी, न्यूझीलंड (2035 चेंडू)
119 – युझवेंद्र चहल, भारत (1674 चेंडू)
119 – आदिल रशीद, इंग्लंड (1988 चेंडू)
117 – टिम साउदी, न्यूझीलंड (2335 चेंडू)
108 – शाकिब अल हसन, बांगला देश (2535 चेंडू)
युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) गेल्या काही काळापासून भारताच्या एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत आहे. गतवर्षीही त्याला टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याआधी तो 2021 च्या टी-20 विश्वचषकातही संघाचा भाग नव्हता. अशा परिस्थितीत आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत त्याच्या खेळण्याबाबत सस्पेंस आहे. चहलने 2016 मध्ये भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते परंतु तेव्हापासून त्याने केवळ 72 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 121 एकदिवसीय विकेट्स आहेत. या वर्षी जानेवारीमध्ये इंदूरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर त्याला वनडेमध्येही संधी मिळाली नाही. आता तो विश्वचषक संघात स्थान मिळवू शकतो की नाही हे पाहावे लागेल.