

पुढारी ऑनलाईन: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील कसोटी मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्ग येथे खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा पहिला डाव 202 धावांवर आटोपला. कर्णधार के. एल. राहुलने अर्धशतकी खेळी खेळली. टीम इंडियाची टॉप ऑर्डर अपयशी ठरली. राहुल वगळता एकाही फलंदाजाला क्रीजवर फार काळ टिकाव धरता आला नाही. पण खालच्या फळीतील फलंदाजांनी काही चांगले शॉट्स मारत संघाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली.
सामन्याच्या 62 व्या षटकात जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या चेंडूवर षटकार मारून सर्वांना आश्चर्यचकित केले. या षटकात बुमराहने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. रबाडाने ओव्हरचा तिसरा चेंडू शॉर्ट टाकला, पण बुमराह आक्रमक मूडमध्ये दिसला. रबाडाच्या या चेंडूवर त्याने हुक शॉट मारला आणि चेंडू थेट सीमापार पाठवला. बुमराहचा हा षटकार पाहून स्टँडमध्ये बसलेली त्याची पत्नी संजना गणेशनही थक्क झाली. ती टाळ्या वाजवताना दिसली. व्हिडिओमध्ये संजना हसताना दिसत आहे. बुमराहच्या सिक्सवर संजनाने दिलेली प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. बुमराहने 11 चेंडूत 14 धावा केल्या. त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. विराट कोहली अनफिट असल्यामुळे या सामन्यात खेळत नाहीये. त्याच्या जागी के. एल. राहुल कर्णधार आहे. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या राहुलने पुन्हा एकदा चांगली खेळी करत 50 धावा केल्या. मात्र, राहुलशिवाय इतर एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही आणि टीम इंडियाचा पहिला डाव 202 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॉन्सनने 4 बळी घेतले.
202 धावांत सर्वबाद झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. सलामीवीर एडन मार्करामला बाद करून मोहम्मद शमीने टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. दक्षिण आफ्रिकेची पहिली विकेट 14 धावांवर पडली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने 1 गडी गमावून 35 धावा केल्या आहेत.