

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs WI : टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिजच्या दौ-यावर आहे. तेथे पाच टी 20 सामन्यांची मालिका सुरू असून त्यातील तीन सामने खेळले गेले आहेत. आतापर्यंत भारताने दोन आणि विंडिजने एक सामना जिंकल आहे. आता शिल्लक असणारे दोन सामने जिंकून मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडियाचे मैदानात उतरणार आहे. दरम्यान, शनिवार आणि रविवारी होणाऱ्या या सामन्यांमध्ये श्रेयस अय्यरच्या कामगिरीकडे निवडकर्त्यांचे लक्ष आहे.
पाच सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 2-1 ने आघाडीवर आहे आणि अमेरिकन प्रेक्षकांसमोर शेवटचे दोन सामने जिंकू इच्छितो. भारताच्या सध्याच्या संघात श्रेयस अय्यर हा एक असा खेळाडू आहे ज्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. दीपक हुड्डाने संधीचा चांगला उपयोग करून घेतला आणि अशा स्थितीत अय्यरला मधल्या फळीत स्थान मिळवणे कठीण होत आहे. केएल राहुल आणि विराट कोहली आशिया कपसाठी संघात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहेत आणि अशा परिस्थितीत अय्यरला बाहेर बसावे लागू शकते. त्याने आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये 0, 11 आणि 24 धावा केल्या आहेत आणि वेगवान गोलंदाजांसमोर तो अपयशी होत असल्याचे दिसत आहे.
राहुल द्रविडने प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून कोणत्याही खेळाडूला पुरेशा संधी मिळाल्या आहेत, परंतु अय्यरच्या बाबतीत, तो वनडेप्रमाणे टी-20 मध्ये चांगला फॉर्म राखू शकला नाही. द्रविडने गेल्या अडीच महिन्यांत 9 टी-20 सामन्यांमध्ये अय्यरला संधी दिली, परंतु पहिल्या 10 षटकांमध्ये खेळण्याची संधी मिळूनही त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. विंडीजविरुद्ध शेवटच्या दोन सामन्यांमध्ये अय्यरला संधी मिळाल्यास त्याच्याकडे मोठी धावसंख्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
गेल्या सामन्यात आपल्या सर्वोत्तम फटकेबाजीने सर्वांना चकित करणाऱ्या सूर्यकुमार यादवला यावेळी आपला कर्णधार रोहित शर्माची साथ मिळू शकते. तिसऱ्या सामन्यात रोहितला पाठदुखीमुळे मैदान सोडावे लागले होते. त्यावेळी तो 11 धावांवर खेळत होता. मात्र तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर तो खेळण्यासाठी सज्ज झाल्याचे समजते आहे. रोहितही आपल्या फलंदाजांच्या कामगिरीकडे लक्ष देईल. त्याची नजर ऋषभ पंतवर असेल. पंत आपल्या फटक्यांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकेल.
आवेश खानने गेल्या दोन सामन्यांमध्ये चांगली गोलंदाजी केली नाही. परंतु, हर्षल पटेल अद्याप दुखापतीतून पूर्णपणे बरा नसल्यामुळे संघ व्यवस्थापनाकडे आवेशला कायम ठेवण्याशिवाय पर्याय नाही. कुलदीप यादवला मालिकेत सामने खेळायला मिळतात की नाही हे पाहणे देखील मनोरंजक असेल. कारण, हर्षल पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यास भारत अतिरिक्त फिरकी गोलंदाजासह खेळू शकतो.