

पुढारी ऑनलाईन डेस्क : Jasprit Bumrah : भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतामधील चालू असलेल्या कसोटी मालिकेसह आता वनडे मालिकेतूनही बाहेर पडल्याचे समजते आहे. पीटीआयच्या माहितीनुसार, बीसीसीआय बुमराहबाबत कोणतीही मोठी जोखीम घेणार नसून आगामी जागतिक कसोटी चॅम्पियशीप आणि एकदिवसीय विश्वचषक या दोन मोठ्या स्पर्धा लक्षात घेता त्याच्याबाबत सावध पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. डब्ल्यूटीसीच्या फायनलमध्ये टीम इंडियाने धडक मारली तर त्या सामन्यात बुमराह मोठी कामगिरी करु शकतो. असा विश्वास बीसीसीआयला आहे.
बुमराहचे (Jasprit Bumrah) संघातील पुनरागमन सातत्याने पुढे ढकलले जात आहे. यापूर्वी असे मानले जात होते की तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात सामील होईल. पण तंदुरुस्त नसल्यामुळे त्याचे पुनरागमन पुढे ढकलण्यात आले. आता पुन्हा एकदा बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतही टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार नसल्याचे वृत्त आहे. तो सध्या बंगळूर येथील एनसीएमध्ये फिटनेसवर काम करत आहे.
बुमराह मागील काही काळापासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. 25 सप्टेंबर 2022 पासून तो भारतासाठी खेळलेला नाही. दुखापतीच्या कारणास्तव त्याने टी-20 विश्वचषक आणि अनेक मोठ्या मालिका सोडल्या आहेत. मायदेशात सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांमध्ये तो खेळेल अशी अपेक्षा होती, पण गेल्या आठवड्यात तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडल्याची बातमी समोर आली. आता, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेलाही मुकणार असल्याचे पीटीआयने म्हटले आहे.
2023 च्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या समाप्तीनंतर, भारत आणि ऑस्ट्रेलिया 17, 19 आणि 22 मार्च रोजी तीन एकदिवसीय सामने खेळणार आहेत. पण बुमराह (Jasprit Bumrah) या मालिकेतही खेळणार नाही. तो थेट इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये खेळताना दिसेल, असा अंदार वर्तवला जात आहे. आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची फायनल आणि भारतात होणार्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बुमराहच्या फिटनेसची विशेष काळजी घेतली जात असल्याचीही चर्चा रंगली आहे.
बुमराह प्रत्येक फॉरमॅटमध्ये जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये बुमराहने 30 सामन्यांत 128 विकेट घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण कसोटी मालिकेत या वेगवान गोलंदाजाची अनुपस्थिती टीम इंडियासाठी अडचणी निर्माण करू शकते. मात्र, बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसत आहे. त्याला मोहम्मद शमीची चांगली साथ मिळत आहे.