चंद्रपुरातील सागवान काष्ठ अयोध्येकरीता रवाना; बल्लारपूर व चंद्रपूरनगरी झाली ‘राममय’

चंद्रपुरातील सागवान काष्ठ अयोध्येकरीता रवाना; बल्लारपूर व चंद्रपूरनगरी झाली ‘राममय’
Published on
Updated on

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा :  दंडकारण्याचा भाग असलेल्या चंद्रपूरमधील सागवन काष्ठ अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराच्या निर्माण कार्यासाठी वापरले जाणार आहे. हा ऐतिहासिक काष्ठ पूजन शोभायात्रा सोहळा 'याची देही.. याची डोळा' बघण्याकरीता रामभक्त हजारोंच्या संख्येने या शोभायात्रेत सहभागी झाले होते.

श्रीराम जय राम जय जय राम..च्या गजरात भगव्या दिंड्या पताका व गुढी हातात घेऊन परंपरागत मंगल वेषात महिला, पुरुष, अबाल, वृद्ध असे सारेच या शोभायात्रेच्या सर्वात पुढे होते. महिलांनी देखील मंगल कलश डोक्यावर घेवून या काष्ठ पूजन शोभायात्रेची रौनक आणखीनच वाढविली. ह्रदयीराम, वचनीराम, स्मरणीराम घ्यावा, याच भावनेने जणू रामभक्त श्रीराम भक्तीत तल्लीन झाल्याचे चित्र यावेळी सर्वांच्या डोळ्यात भरले. त्यामुळे बल्लारपूर व चंद्रपूर नगरी 'राममय' झाली होती.

बल्लारपूर व चंद्रपूर अशा दोन टप्प्यात ही काष्ठ पूजन शोभायात्रा काढण्यात आली. दरम्यान सर्वप्रथम सायंकाळी 5 वाजता प्रभू श्रीराम मंदिर अयोध्या काष्ठपूजन व शोभायात्रा समितीचे चंद्रपूरचे अध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बल्लारशाह येथील वनविकास महामंडळाच्या लाकूड डेपोमध्ये पुरातन राम व लक्ष्मण काष्ठ जोडीचे वेदमंत्रोच्चारात आचार्य गिरीराज महाराज,ना.सुधीर मुनगंटीवार व त्यांची पत्नी सपना मुनगंटीवार यांनी काष्ठपूजन केले.

यानंतर एफडीसीएम प्रवेशद्वार ते जुना बसस्थानक चौक, रेल्वे चौक, नगर परिषद चौक, बसस्थानक, काटा गेट, तीन इक्का गेट आणि कला मंदिर चौकापर्यंत शोभायात्रा पोहोचली. यानंतर शोभायात्रा चंद्रपूरकडे रवाना झाली.

जवळपास दोन किमी लांब या शोभायात्रेचे ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. संपूर्ण शोभायात्रेवर ड्रोन कॅमेऱ्याची नजर ठेवण्यात आली होती. एकीकडे श्रीरामाचा नामजप तर दुसरीकडे ढोल-ताशांचा गजर, वानराच्या वेशभूषेतील चिमुकल्यांची सेना, महिला कलाकारांचे तलवारबाजीचे प्रदर्शन आदींचा या मिरवणुकीत समावेश होता.

90 च्या दशकातील रामायण मालिकेची जनतेला भुरळ कायम

90 च्या दशकात रामायण मालिकेची भुरळ अद्यापही अनेकांना लागली होती. या मालिकेत राम, सीता आणि लक्ष्मण यांची भूमिका साकारणारे जणू खरेखुरे पात्रच अनेकांच्या लक्षात आहे.

रामभक्तांच्या स्वप्नपूर्तीचा क्षण : ना. मुनगंटीवार

अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या भव्य मंदिराला अनेक द्वार असणार आहेत. 1000 वर्ष हे मंदिर जसेच्या तसे रहावे म्हणून लोखंड व सिमेंटचा वापर न करता. परंपरागत (लॉकिंग सिस्टिम) पद्धतीने मंदिर निर्माण कार्य सुरू आहे. यासाठी 1000 वर्ष टिकणारे सागवान आपल्या जिल्ह्यातील असल्याचा निर्वाळा उतरखंडातील तज्ञानी दिला. श्रीरामचंद्रांचे पिता महाराज दशरथ यांच्या मातोश्री इंदूमती या विदर्भाच्या. त्यामुळे आजीच्या भूमीतून नातवाच्या मंदिर निर्माणासाठी सागवन काष्ठ जात असल्याचा हा ऐतिहासिक क्षण आहे. संपूर्ण महाराष्ट्रासाठीच नाही तर देशातील रामभक्तांच्या स्वप्नपूर्तीचा क्षण आहे, असे वनमंत्री व श्रीराम मंदिर अयोध्या, काष्ठ पूजन व शोभायात्रा समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news