

शिर्डी, पुढारी वृत्तसेवा: शाळकरी विद्यार्थिनींना अश्लिल व्हिडीओ दाखविणार्या जिल्हा परिषदेच्या चावट शिक्षकाला शिर्डीतील संतप्त पालकांनी चांगलाच चोप दिल्याने खळबळ उडाली आहे. या शिक्षकास शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्री उशिरापर्यंत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
शिर्डीतील ज्ञान मंदिरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेबाबत सोमवारी दिवसभर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. शिर्डीच्या जिल्हा परिषद शाळेत वर्ग शिक्षक विद्यार्थिनींना अश्लील व्हिडीओ दाखवतात, अशी माहिती काही विद्यार्थिनींनी पालकांना दिली होती. हा धागा पकडून सोमवारी काही पालकांनी शाळा गाठली. विद्यार्थिनींकडून माहिती घेतली असता, काही विद्यार्थिनींनी वर्गशिक्षक अश्लील व्हिडीओ दाखवतात, यास दुजोरा दिला. त्यानंतर संतप्त जमावाने त्या शिक्षकास विचारणा करायला सुरुवात केली. जमावातील काहींनी त्या शिक्षकाला चोप दिला.
दरम्यान, आणखी एक शिक्षक असाच प्रकार करीत असल्याचे पुढे आले. शिर्डी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघा शिक्षकांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.