

चाकण, पुढारी वृत्तसेवा: तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याची समस्या जटील होत चालली आहे. याबाबत अनेकदा राजकीय मंडळी आश्वासन देत असून प्रत्यक्ष जागेवर काडीही हलत नाही. सततचे प्राणघातक अपघात आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे मेदनकरवाडी (ता. खेड) येथे शुक्रवारी (दि. 23) घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत विविध गावाचे सरपंच, सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याबाबतच्या लढ्यासाठी या वेळी कृती सामितीची स्थापना करण्यात आली.
खेड तालुक्यातील तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यालगत असणार्या महाळुंगे, खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, रासे, भोसे आदी सर्व गावातील आजी-माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि परिसरातील नागरिक आढावा बैठकीस उपस्थित होते. सन 1980 मध्ये तयार झालेला हा रस्ता गेली 30 ते 35 वर्षे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे, प्रशासकीय अधिकार्यांच्या ढिसाळ कारभारामुळे 'जैसे थे' परिस्थितीमध्ये आहे. चाकण परिसराला उद्योगनगरीचे स्वरूप येऊनसुद्धा या रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीसारखी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मागील काही वर्षांत जवळपास 1 हजारपेक्षा अधिक नागरिकांचा बळी यामध्ये गेला आहे. चाकण उद्योगनगरीमध्ये जाणारा कामगारवर्ग, त्यांच्या बस वेळेत कंपनीमध्ये पोहोचत नसल्यामुळे चाकण परिसरातील विविध व्यवसाय दुसरीकडे स्थलांतरित होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढले आहे आणि नवीन उद्योग चाकण परिसरात येण्यासाठी निरुत्साही आहेत.
या आढावा बैठकीमध्ये विविध लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांची नोंद घेण्यात आली. येत्या काही दिवसांमध्ये आलेल्या सूचनांवर फेरविचार करण्यासाठी तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्ता प्रश्नासाठी व्यापक कृती समिती स्थापन करण्यात येणार आहे. या कृती समितीद्वारे प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासमवेत संयुक्त बैठक घेऊन सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम आराखडा तयार करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. या वेळी पुणे महानगर नियोजन समिती सदस्य वसंत भसे, खेड तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पवार, गणेश बोत्रे, शिवाजी वर्पे, मेदनकरवाडीचे सरपंच अमोल साळवे, महेंद्र मेदनकर, विशाल पोतले, आप्पासाहेब कड, संदेश साळवे, महेश जाधव, प्रकाश चौधरी, शरद लेंडघर, खासदार प्रतिनिधी तेजस झोडगे आदींसह विविध गावाचे प्रतिनिधी उपस्थित होते. तातडीने या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा विविध गावाचे सरपंच, पदाधिकारी आणि नागरिकांनी दिला.