

टी-20 वर्ल्डकप मध्ये भारत आणि पाकिस्तान (india and pakistan match) हे दोन 'सख्खे शेजारी आणि पक्के वैरी' आतापर्यंत 5 वेळा एकमेकांच्या आमने-सामने आले आहेत. मात्र, पाचही वेळा भारताने पाकिस्तानला चारीमुंड्या चित केले आहे. आता हे दोन्ही देश टी-20 वर्ल्डकप मध्ये आज, 24 ऑक्टोबर रोजी लढणार आहेत. यामुळे पाकिस्तानला सहाव्यांदा हरवण्याचा 'मौका' भारताला मिळणार आहे. गेल्या पाच लढती कशा झाल्या, त्याचा हा 'रिकॅप'….
भारत 5 धावांनी विश्वविजेता
भारत-पाकिस्तान हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात पुन्हा भिडले. गौतम गंभीर (75) आणि रोहित शर्मा (30*) यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने 5 बाद 157 धावा केल्या. भारताच्या या आव्हानाचा पाकिस्तान योग्य पद्धतीने पाठलाग करीत होता. परंतु; शेवटच्या 4 चेंडूंत 6 धावा हव्या असताना मिसबाह-उल-हकने आत्मघाती फटका मारला आणि तो श्रीशांतकडे झेल देऊन बाद झाला. भारताने हा सामना 5 धावांनी जिंकून पहिल्या टी-20 वर्ल्डकपचे विजेतेपद दिमाखात पटकावले. (india and pakistan match)
भारताने पाकिस्तानला केले 'बॉल आऊट'
दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान दर्बनच्या मैदानात पहिल्यांदा आमने-सामने आले. हा सामना 'टाय' झाला. त्यावेळी 'सुपर ओव्हर'चा नियम अस्तित्वात नव्हता. त्यामुळे सामन्याचा निकाल 'बॉल आऊट'वर घेण्यात आला. सहा चेंडूंत जास्तीत जास्त 'स्टम्प हिट' करणारा संघ यात विजयी ठरतो. भारताने यात बाजी मारली आणि पाकिस्तानवर विजयाची नोंद केली.
भारत 8 विकेटस्नी विजयी
श्रीलंकेत झालेल्या 2012 च्या वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सुपर-8 फेरीचा सामना रंगला. अत्यंत एकतर्फी झालेल्या या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 8 विकेटस्नी पराभव केला. लक्ष्मीपती बालाजीने 3 विकेटस् घेत पाकिस्तानला 128 धावांवर गुंडाळले. विराट कोहलीच्या नाबाद 78 धावांच्या जोरावर भारताने हे आव्हान 2 विकेटस्च्या मोबदल्यात पूर्ण केले.
भारत 7 विकेटस्नी विजयी
2014 मध्ये बांगला देशात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानला 7 विकेटस्नी हरवून आपला दबदबा कायम ठेवला. ढाक्याच्या मैदानावर पाकिस्तानने पहिल्यांदा 7 बाद 130 धावा केल्या. भारताने हे आव्हान 9 चेंडू शिल्लक ठेवून आरामात पूर्ण केले.
भारत 6 विकेटस्नी विजयी
कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर भारताने पाकला पुन्हा एकदा लोळवले. पावसामुळे बाधित झालेला हा सामना 18 षटकांचा करण्यात आला. यामध्ये पाकिस्तानने 118 धावा केल्या. या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अवस्था 3 बाद 23 अशी झाली होती. परंतु; विराट कोहलीच्या 37 चेंडूंतील नाबाद 55 धावांच्या जोरावर भारताने हा सामना 6 विकेटस्नी जिंकला.
जावेद मियाँदाद यांच्याशी किरण मोरे यांची वर्ल्ड कप 1992 मध्ये झालेली हुज्जतबाजी विसरलीच जाऊ शकत नाही. मियाँदाद याने मोरेला चिडवण्यासाठी म्हणून मैदानात बेडकासारख्या उड्या मारल्या.धाव घेताना मियाँदाद क्रीझमध्ये परतत असताना मोरेने बेल्स उडविल्या आणि अपिल केले. मियाँदाद भडकला आणि बेडकासारख्या उड्या मारू लागला. थोड्या वेळाने मियाँदाद खरोखर बाद झाला, तेव्हा मोरेनेही मियाँदादच्या शैलीत उड्या मारून प्रत्युत्तर दिले.
1996 च्या विश्वचषकात पंधराव्या षटकात आमिर सोहेलने प्रसादला चौकार लगावला. त्याच दिशेला बॅट दाखवून पुन्हा इथेच तुला चौकार ठोकेन, असे आमिरने प्रसादला खुणावले. पण पुढच्याच चेंडूवर आमिरचा त्रिफळा त्याने उडविला आणि आमिरला 'जा आता घरी' असे खुणावून सांगितले.
आशिया कप 2010 मधील सामन्यात हरभजन सिंग याने मोहम्मद आमिरच्या चेंडूवर षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात भज्जी आणि शोएबचे जोरदार भांडण झाले. शोएब इतका रागात होता की, भज्जीशी भांडायला हॉटेलपर्यंतही धडकला होता.
आशिया कप 2010 मध्येच सलामीचे फलंदाज गौतम गंभीर आणि महेंद्र सिंह धोनी मैदानात होते. पाक यष्टीरक्षक कामरान अकमल वारंवार अपिल करत होता. गंभीर त्याच्यावर भडकला. मैदानातच दोघांत कडाक्याचे भांडण झाले. पंचांनी मध्यस्थी केली.
गौतम गंभीर यापूर्वीही 2007 मध्ये शाहिद आफ्रिदीला भिडला होता. दोघांनी एकमेकांना भर मैदानात शिवीगाळ केली होती. त्यावेळीही पंचांना मध्यस्थी करावी लागली होती.