

पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs PAK T20 WC : टी-20 विश्वचषक स्पर्धेला 2 जून पासून सुरुवात होणार आहे. दरम्यान, ९ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला रंगणार आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट स्टेडियमवरील 'ड्रॉप-इन खेळपट्टी'वर खेळवला जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. यासाठी ऑस्ट्रेलियातील अॅडलेड येथून ही खेळपट्टी आणण्यात आली आहे. पण ड्रॉप-इन खेळपट्टी म्हणजे काय? या खेळपट्टीची खासियत काय आहे? या विषयी सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
ड्रॉप-इन खेळपट्टी म्हणजे अशी खेळपट्टी जी मैदान किंवा त्याच्या ठिकाणापासून दूर कुठेतरी बनविली जाते आणि नंतर ती मैदानामध्ये आणून बसविण्यात येते. यामुळे एकाच मैदानाचा वापर विविध प्रकारच्या खेळांसाठी करता येतो. ज्यामुळे फुटबॉल, रग्बी सारखे खेळही याच मैदानात खेळले जाऊ शकतात. क्रिकेटमध्ये ड्रॉप-इन खेळपट्टीचा सर्वप्रथम वापर पर्थ क्युरेटर जॉन मॅली यांनी 1970 मध्ये केला होता.
सामना सुरू होण्याच्या अवघ्या 24 तास आधी ड्रॉप-इन खेळपट्ट्या बसवल्या जाऊ शकतात. तसेच, सामना संपल्यानंतर त्या सहज काढता येतात. टी-20 विश्वचषकासाठी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी क्रिकेट मैदानामध्ये या खेळपट्ट्या वापरल्या जाणार आहेत. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याव्यतिरिक्त या मैदानावर इतर अनेक संघांचे सामनेही अशाच खेळपट्टीवर खेळवले जाणार आहेत. (IND vs PAK T20 WC)
विशेषतः ऑस्ट्रेलियामध्ये ड्रॉप-इन खेळपट्ट्या खूप लोकप्रिय आहेत. तेथील मेलबर्न क्रिकेट मैदानाच्या खेळपट्टीवर नजर टाकली तर त्याची लांबी 24 मीटर, रुंदी तीन मीटर आणि खोली 20 सेमी आहे. काळ्या मातीच्या थरानंतर, वर गवत उगवले जाते आणि ही संपूर्ण प्रक्रिया स्टील फ्रेममध्ये होते. जेव्हा क्रिकेटचा सामना होतो, तेव्हा 30 टन वजनाच्या या खेळपट्ट्या ट्रेलरने उचलल्या जातात आणि 27 मीटर खोल सिमेंट स्लॅबवर ठेवल्या जातात. ही खेळपट्टी स्टीलच्या चौकटीत बनलेली असल्याने ती कठीण असते आणि पारंपारिक खेळपट्ट्यांप्रमाणे तुटत नाही.