

पुढारी ऑनलाईन डेस्क : NZ vs PAK T20 : मायकेल ब्रेसवेलच्या भेदक मा-यानंतर, फिन ॲलन आणि डेव्हन कॉनवे यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने तिरंगी टी 20 मालिकेत पाकिस्तानचा 23 चेंडू आणि नऊ गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांचे आघाडीच्या फळीतील फलंदाज एकापाठोपाठ तंबूत परतले. त्यामुळे पाकचा संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. त्यांनी 20 षटकांत सात गडी गमावून 130 धावांपर्यतच मजल मारता आली.
न्यूझीलंडने विजयी लक्ष्याचा पाठलाग अवघ्या 16.1 षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात केला. ॲलन (42 चेंडूत 62, 1 चौकार, 6 षटकार) आणि कॉनवे (46 चेंडूत नाबाद 49, पाच चौकार) यांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी करत न्यूझीलंडचा विजय निश्चित केला. ॲलन बाद झाल्यानंतर कर्णधार केन विल्यमसन मैदानात आला. त्याने नऊ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडचा तीन सामन्यांमधला हा दुसरा विजय असून, त्यांचे पाकिस्तानच्या बरोबरीने चार गुण झाले आहेत. स्पर्धेतील तिसरा संघ असलेल्या बांगलादेशला अद्याप गुणांचे खाते उघडता आलेले नाही. अव्वल दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील. (NZ vs PAK T20)
तत्पूर्वी प्रथम गोलंदाजी करताना किवी ऑफस्पिनर ब्रेसवेलने (11 धावांत 2 बळी) पाकच्या फलंदाजीला सुरुंग लावला. त्याने सलामीवीर मोहम्मद रिझवान (16) आणि कर्णधार बाबर आझम (21) यांना बाद पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. दोघे सलामीवीर स्वस्तात बाद झाल्याने मोठी धावसंख्या उभारण्याच्या पाकिस्तानच्या आशा धुळीस मिळाल्या. त्यानंतर मिचेल सँटनर (27 धावांत 2 बळी) आणि टीम साऊदी (31 धावांत 2 बळी) यांनीही अचूक मारा केला. इफ्तिखार अहमद (27) आणि आसिफ अली (नाबाद 25) यांनी थोडाफार प्रतिकार केला आणि संघाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहचवले. (NZ vs PAK T20)