

गडचिरोली; पुढारी वृत्तसेवा : गडचिरोली वन विभागांतर्गत जंगलात धुमाकूळ घालून ८ जणांचे जीव घेणाऱ्या टी-६ नामक वाघिणीने
(T-6 Tigress) ४ बछड्यांना जन्म दिला आहे. शुक्रवारी (दि.९) रात्री ही वाघीण आपल्या बछड्यांसह वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाली. टी-६ वाघिणीने आतापर्यंत ८ जणांचा बळी घेतला आहे. त्यामुळे या वाघिणीला जेरबंद करण्याची मागणी लक्षात घेता वनविभागाने अमरावती आणि ताडोबा येथील चमूला पाचारण केले होते.
जवळपास महिनाभरापासून या वाघिणीच्या हालचालींवर पथक पाळत ठेवून होते. परंतु अनेकदा तिने या पथकाला हुलकावणी दिली. दरम्यान, शुक्रवारी गडचिरोली तालुक्यातील राजगाटा चेक गावानजीकच्या जंगलात लावलेल्या कॅमेऱ्यात ही वाघीण आपल्या चार बछड्यांसह दिसून आली. त्यामुळे वनविभागाने या वाघिणीला पकडण्याची मोहीम तूर्तास स्थगित केली आहे. चारही पिल्लं सुदृढ असून, ते पूर्णत: आईवर अवलंबून असल्याने सध्या तरी तिला जेरबंद करता येणार नाही, असे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.
(T-6 Tigress ) बछड्यांसह फिरणारी वाघीण खूप आक्रमक असते. तिच्या जवळ कुणी गेला, तर ती हल्ला करू शकते. त्यामुळे चातगाव परिसरातील नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा वन विभागाने दिला आहे.
हेही वाचा :