

वाफगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वाफगाव ( ता.खेड ) येथे एका शेतात आकाशातुन पडलेली अज्ञात संशयास्पद वस्तू सापडली आहे. यामुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून घबराट पसरली आहे. परंतु, हे सॅटेलाईट उपकरण हवामान विभागाच्या निरक्षणाचे असल्याचा अंदाज उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाफगाव येथे पूर्वेकडे तळ्याचे माळ आहे. या माळाजवळील शेतात शेतकरी शंकर भालेकर हे बुधवार ३१ मे रोजी सकाळी फेरफटका मारत असताना त्यांना ही अज्ञात वस्तू आकाशातून शेतात पडलेले आढळले व त्यातून पॅराशूट बाहेर पडलेले दिसले. त्यांनी या बाबत माजी उपसरपंच अजय भागवत व पोलीस पाटील माऊली कराळे यांना कळवले. त्यांनी या घटनेची कल्पना संबंधित विभाग व खेडचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांना फोन करून दिली. याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक केंद्रे यांनी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी केली व हे उपकरण ताब्यात घेतले. या उपकरणावर कोरियन भाषेत मजकूर लिहिलेला आढळला. त्यामुळे ते कोरियन उपकरण असल्याचा अंदाज आहे.
तसेच त्या उपकरणावर weather लिहिले गेले असल्याने हे उपकरण हवेचा दाब, उष्णता, हवेतील आद्रता, हवेची दिशा व पावसाचा अंदाज व्यक्त करणारे असल्याचे माजी उपसरपंच अजय भागवत यांनी सांगितले. यावेळी पाहणी स्थळावर माजी उपसरपंच अजय भागवत ,ग्रामपंचायत सदस्य अमोल कराळे ,पोलीस पाटील माऊली कराळे ,सामाजिक कार्यकर्ते रज्जाक इनामदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे उपकरण पुणे येथील हवामान विभागाचे असून ते हवामान मोजण्यासाठी सोडलेले आहे. ही वस्तू संशयास्पद नसल्याने ग्रामस्थांनी घाबरून जाऊ नये
-राजकुमार केंद्रे, पोलीस निरीक्षक खेड पोलीस