

बीजिंग : फ्राईड राईस, चॉप्सी, मंच्युरियन, स्प्रिंग रोल्स असे अनेक चायनीज डिश लोकप्रिय होत आले आहेत. पण, एक चायनीज डिश अशीही आहे, ज्यात चक्क दगड तळून ती तयार केली जाते! सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत एक शेफ चमकणारी छोटी काळी दगडे तळताना दिसून आला त्यावेळी अनेकांना आश्चर्याचा धक्का होता. सुओडियू ही जगातील सर्वात 'हार्ड डिश' मानली जाते. या विचित्र डिशची उत्पती हुबेई या प्रांतात झाली, असे मानले जाते.
यांगत्झी नदीच्या किनार्यावरील नाविकांना भाज्या मिळत नव्हत्या. यातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी मसाल्यांसह दगडही तळणे सुरू केले आणि तेव्हापासूनच ही डिश प्रचलित झाली. मसाले, लसणाच्या पाकळ्या, मिरच्या आणि छोटे काळे दगड टाकून ही डिश तयार केली जाते. मात्र, यातील दगडे खाण्यासाठी असत नाहीत. ती फक्त चोखून टाकण्यासाठी असतात. सुओडियू या शब्दाचा अर्थच मुळी चोखणे व टाकून देणे असा आहे.