

पुणे, पुढारी वृत्तसेवा: राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतंर्गत उसतोडणी यंत्र अनुदान योजना 2023-24 ही कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलद्वारे राबविण्यात येणार असल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. साखर कारखाने गटांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा 21 एप्रिलपासून सुरु होणार आहे.
ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी इच्छुक असणार्या शेतकर्यांनी, वैयक्तिक व्यावसायिकांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने ऊस तोडणीसाठी दिलेल्या प्रक्रियेनुसार अर्ज करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्थांना अनुदान उपलब्ध करुन देण्यास शासनाने 20 मार्च 2023 च्या शासन निर्णयाअन्वये मान्यता दिलेली आहे.
कृषी विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीद्वारे अर्जदारांना त्यांच्या पसंतीच्या ऊस तोडणी यंत्र निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. या योजनेतंर्गत पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व सुसूत्रता येऊन वरिष्ठ स्तरावरुन योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करणे शक्य होईल.
https://mahadbtmaharashtra.gov.in/Farmer/login/login हे महा-डीबीटी पोर्टलचे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील सूचनांप्रमाणे अर्ज भरावा. स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्रासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्जदार अर्ज करु शकतील.
अर्जदारांनी प्रथमतः वापरकर्त्याचे नांव (युजर नेम) व संकेत शब्द (पासवर्ड) तयार करुन नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर पुन्हा लॉग-इन करुन त्यांचे प्रोफाईल तयार करावे. अर्जदारांना ऊस तोडणी यंत्रांना अनुदान या घटकासाठी वैयक्तिक लाभार्थी/उद्योजक व शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था, साखर कारखाने असे नोंदणी पर्याय उपलब्ध असतील. अर्जदारांनी पर्याय निवडल्यानंतर महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याबाबत सविस्तर माहिती पोर्टलवर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक घटकाने अर्ज कशा पध्दतीने करावा. तसेच अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावीत, या बाबतची सविस्तर माहिती पोर्टलवर देण्यात आली आहे.
अर्जदाराने वैयक्तिक तपशिल भरण्याबाबत त्यांनी कळविले आहे की, वैयक्तिक लाभार्थी, उद्योजक म्हणून नोंदणी केलेल्या सर्व शेतकर्यांना प्रथमतः त्यांचा वैयक्तिक तपशील भरणे बंधनकारक आहे. या सदरामध्ये तारांकित (*) बाबींची माहिती देणे अनिवार्य आहे. ही माहिती भरल्यानंतरच लाभार्थ्यांना ऊस तोडणी यंत्र अनुदान या घटकासाठी अर्ज करता येईल. ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करताना अर्जदारांना 23 रुपये 60 पैसे अर्ज शुल्क म्हणून ऑनलाईन भरावयाचे आहे.
तक्रार, सूचनांबाबत अर्जदारांना अर्ज करतेवेळी काही अडचणी येत असतील अथवा काही सूचना करावयाच्या असल्यास ते महा-डीबीटी पोर्टलवरील तक्रारी-सूचना या बटनावर क्लिक करुन आपली तक्रार, सूचना नोंदवी शकतील, असेही गायकवाड यांनी सांगितले आहे. ऊस तोडणी मशिनसाठी किंमतीच्या 40 टक्के किंवा जास्तीत जास्त 35 लाख रुपयांइतके अनुदान मंजूर आहे. योजनेसाठी केंद्र सरकारचे 192 कोटी आणि राज्य सरकारचे 108 कोटी मिळून 300 कोटी रुपयांची ही अनुदान योजना आहे.