

माळेगाव, पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यातील माळेगाव बागायती पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेक शेतकर्यांची उसाची पिके भुईसपाट झाली. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
माळेगाव परिसरात गेले तीन-चार दिवस परतीच्या पावसाने कहर केला आहे. गुरुवारी (दि. 13) मुसळधार पाऊस पडला. कुरण विभागांतर्गत येत असणार्या वाघमोडे वस्ती, खोमणे वस्ती, गोफणे वस्ती, मदने वस्ती या भागातील शेतकरी अजिंक्य उत्तम वाघमोडे, उत्तम पांडुरंग वाघमोडे, संभाजी वाघमोडे, अक्षय वाघमोडे, नंदकुमार पंडित भोसले, सूर्यकांत मारुती मदने यासह अनेक शेतकर्यांची उभी उसाची पिके पावसाच्या तडाख्याने जमीनदोस्त झाली आहेत. त्याचबरोबर काही शेतकर्यांची बाजरी, सोयाबीन, मका ही पिकेदेखील भुईसपाट झाली आहेत. हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाल्याने शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
सध्या पावसाचा जोर कायम असल्याने शेतकरी वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. वास्तविक पाहता या भागातील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करणे अपेक्षित आहे. मात्र, याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे त्वरित करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकर्यांमधून होत आहे.