Sudhakar Badgujar : बडगुजरांच्या घर, कार्यालयातून कागदपत्रे जप्त; ‘एसीबी’ची मध्यरात्रीपर्यंत घरझडती

Sudhakar Badgujar : बडगुजरांच्या घर, कार्यालयातून कागदपत्रे जप्त; ‘एसीबी’ची मध्यरात्रीपर्यंत घरझडती
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- बनावट दस्तऐवज तयार करीत महानगरपालिकेची फसवणूक केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यासह फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) बडगुजर यांच्या निवासस्थानासह कार्यालयाची रविवारी (दि.१७) झडती घेतली. बडगजुर यांच्या घरासह कार्यालयातून गुन्ह्यासंदर्भातील महत्वाची कागदपत्रे जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच 'एसीबी'ने बडगुजर यांना सोमवारी चौकशीसाठी बोलावले होते, मात्र बडगुजर यांनी मुदत मागितल्याने त्यांना शुक्रवारी (दि.२२) सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टीत सहभागी असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यातच तत्कालीन मनपा आयुक्त प्रविण गेडाम यांच्या तक्रारीच्या आधारे 'एसीबी'ने बडगुजर यांच्याविरोधात रविवारी गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या अनुषंगाने विभागाने बडगुजर यांच्यासह इतर दोन संशयितांच्या घरी व कार्यालयात झडती घेतली. मध्यरात्रीपर्यंत सुरु असलेल्या या झडतीतून 'एसीबी'ने महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. सोमवारी बडगुजर यांनी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. मात्र त्यांनी कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ मागितल्याने विभागाने त्यांना शुक्रवारपर्यंत मुदत दिली असून शुक्रवारी चौकशीस हजर राहण्यास सांगितले आहे.

पोलिसांकडेही हजर नाही

बडगुजर यांनी सोमवारी अस्वस्थ वाटत असल्याचे कारण देत दहशतवाद्यासोबतच्या पार्टीतील व्हिडीओ प्रकरणी सुरु असलेल्या पोलिस चौकशीस हजर राहणे टाळले. त्यामुळे गुन्हे शाखेने बडगुजर यांना मंगळवारी (दि.१९) हजर राहण्यास सांगितले आहे. 'त्या' पार्टीच्या संपूर्ण व्हिडिओची तपासणी करुन त्यातील इतरांची ओळख पटवून त्यांनाही गुन्हे शाखेकडून चौकशीसाठी बोलवले जात आहे.

१५ कंत्राटे स्विकारलेली

तत्कालीन मनपा आयुक्त गेडाम यांनी १७ मे २०१६ रोजी सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्यासह बडगुजर ॲण्ड बडगुजर कंपनीची चौकशी करण्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागास पत्र दिले. त्यानुसार बडगुजर यांची १२ ऑगस्ट २०१६ पासून खुली चौकशी सुरु झाली. चौकशीतून बडगुजर यांनी फेब्रुवारी १९९२ मध्ये कंपनी सुरू केली. ३० नोव्हेंबर २००६ पर्यंत बडगुजर हे कंपनीचे प्रोप्रायटर होते. नगरसेवक पदाची निवडणूक लढवायची असल्याने बडगुजर यांनी ३० नोव्हेंबर २००६ मध्ये साहेबराव रामदास शिंदे व सुरेश भिका चव्हाण यांना प्रत्येकी २० हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कंपनीत भागीदार केले. त्यासाठी त्यांनी डीड ऑफ पार्टनरशिप नोटरी केली. तसेच भागीदारी व्यवसायात बडगुजरांनी स्वत:कडे कंपनीचा ३३.३३ टक्के, शिंदेकडे ३३.३४ व चव्हाण यांच्याकडे ३३.३३ टक्के हिस्सा ठेवला. तसेच ६ डिसेंबर २००६ रोजी बडगुजर यांनी कंपनीतून निवृत्ती घेतल्याची बनावट कागदपत्रे तयार केली. दरम्यान, कंपनीच्या एका बँक खात्याच्या व्यवहारांवरून १६ डिसेंबर २००६ ते २३ डिसेंबर २०१५ या कालावधीत ३७६ वेळा टू सेल्फ या सदराखाली ६ कोटी ३६ लाख ७६ हजार १९५ रुपये रोख स्वरुपात काढण्यात आले. हे व्यवहार संशयास्पद असल्याचा दावा विभागाने केला आहे. तर बडगुजर यांनी पदांचा दुरूपयोग करुन दोन साथीदारांसह कंपनीसाठी महापालिकेचे कोट्यवधी रुपयांची १५ कंत्राटे मिळवून दिल्याचा आरोप आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news