

अग्नी-5 या न्यूक्लियर बॅलेस्टिक मिसाईलची यशस्वी चाचणी हे भारताच्या सामरिक सज्जतेतील एक महत्त्वाचे पाऊल आहे. या चाचणीमुळे भारताच्या टप्प्यात फक्त चीन-पाकिस्तान नाही, तर निम्मे जग आले आहे. भारताकडे अग्नी सीरिजची 1 ते 5 क्षेपणास्त्रे असून प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे. अग्नी-5 हे सर्वात शक्तिशाली असल्याने त्याला दिव्यास्त्र म्हटले जाते.
युद्धशास्त्रामध्ये युद्ध टाळण्यासाठीच्या पर्यायांमध्ये सामरिक सज्जतेचा समावेश आहे. सामरिक सज्जता ही कोणत्याही राष्ट्राची संरक्षक ढाल समजली जाते. सामरिक सामर्थ्याची स्वतःची अशी एक दहशत असते. या दहशतीमुळे आपले शत्रू आपल्याविरोधात कारवाया करताना दबावाखाली असतात. आज जगभरात अण्वस्त्रधारी बनण्याच्या स्पर्धेमागे हाच विचार असल्याचे दिसून येईल. भारताचा विचार करता निसर्गतः लाभलेल्या दोन शेजारी राष्ट्रांच्या सततच्या उपद्रवामुळे आणि भविष्यातील संभाव्य धोक्यांमुळे आपल्याला सामरिक सज्जतेमध्ये वृद्धी करण्यावाचून गत्यंतर नाहीये. असे असूनही भारत आज संरक्षणावरील खर्चाबाबत या दोन राष्ट्रांपेक्षा मागे आहे हे वास्तव आहे. अलीकडेच चीनचे डिफेन्स बजेट जाहीर झाले असून त्यामध्ये करण्यात आलेली घसघशीत वाढ भारतासह जगाच्या चिंता वाढवणारी ठरली आहे. चीनकडून नजीकच्या भविष्यात भारताविरुद्ध युद्ध छेडले जाण्याच्या शक्यता सातत्याने जागतिक अभ्यासकांकडून व्यक्त होत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतानेही आपली सामरिक सज्जता वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांना गती दिली आहे. अलीकडेच मल्टीपल इंडिपेंडन्टली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) तंत्रज्ञानासह पूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या अग्नी-5 या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी यशस्वी झाली आहे.
डीआरडीओने 2022 मध्येदेखील भारताच्या शक्तिशाली क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. तेव्हा या क्षेपणास्त्रांनी 5,500 किमी दूरपर्यंतचं लक्ष्य यशस्वीपणे उद्ध्वस्त केले होते. हे क्षेपणास्त्र डीआरडीओ आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेडने संयुक्तपणे विकसित केलेले असून त्यामुळे पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांची संपूर्ण भूमी भारताच्या रडारवर आली आहे.
भारताने आधीच अग्नी-1,2,3 क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत. या तिन्ही क्षेपणास्त्रांची रचना पाकिस्तानकडून निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन करण्यात आली; पण अग्नी-5 हे चीनसमोरील आव्हानांसाठी खास तयार करण्यात आले आहे. भारताचा अण्वस्त्र कार्यक्रम मुख्यतः चीन आणि पाकिस्तानसह त्याच्या शत्रूंविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी आहे, कारण भारताचे 'नो फर्स्ट यूज' हे धोरण आहे. या धोरणामुळे भारत कोणत्याही देशावर प्रथम अण्वस्त्राचा वापर करणार नाही. त्यामुळेच भारत आपली प्रत्युत्तर स्ट्राईक क्षमता बळकट करत आहे. एमआयआरव्ही हे अतिशय प्रगत तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामुळे एकच क्षेपणास्त्र अनेक ठिकाणी हल्ले करू शकते. या तंत्रज्ञानामुळे एका क्षेपणास्त्रावर दोन ते पाच अशी विविध क्षमतेची अण्वस्त्रे तैनात करून ती काही हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्यावर एकाच वेळी डागता येणे शक्य होणार आहे. यामुळेच हे तंत्रज्ञान असलेले क्षेपणास्त्र शत्रू राष्ट्रातील महत्त्वाची शहरे एकाच हल्ल्यात उद्ध्वस्त करू शकते.
सद्यस्थितीत हे असे तंत्रज्ञान मोजक्याच देशांकडे आहे. यामध्ये अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स आणि चीन या देशांचा समावेश होतो. आता भारत या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. भारताच्या अग्नी-5 क्षेपणास्त्राची मारक क्षमता 5000 ते 7000 किलोमीटर इतकी आहे. अण्वस्त्र हल्ला करण्यासोबतच हे क्षेपणास्त्र पारंपरिक स्फोटके वाहून नेण्यासही सक्षम आहे. चिनी संशोधकांनी अग्नी-5 क्षेपणास्त्राची वास्तविक पल्ला 8,000 किलोमीटर असल्याचा दावा केला आहे. हे तीन-स्टेज, रोड-मोबाईल, कॅनिस्टर, सॉलिड-इंधन असलेले आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र भारताच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडच्या अंतर्गत आहे. याच्या एका युनिटची किंमत अंदाजे 50 कोटी रुपये आहे. अग्नी-5 क्षेपणास्त्राची लांबी 17.5 मीटर आहे, तर त्याचा व्यास अंदाजे 2 मीटर आहे. या क्षेपणास्त्राचे वजन 50000-56000 किलोग्रॅम आहे. अग्नी-5 क्षेपणास्त्राचा वेग 30,600 किमी प्रति तास इतका आहे. त्यामुळेच याला 'दिव्यास्त्र' असे नाव दिले गेले आहे.
भारताशी शस्त्रास्त्रांची स्पर्धा करू पाहणार्या पाकिस्तानला तीन वर्षांपूर्वी अशाच क्षेपणास्त्राच्या चाचणीत अपयश आले होते. पाकिस्तानने 2.750 किमी शाहीन-3 क्षेपणास्त्राचा वापर करून मल्टिपल इंडिपेंडेंट टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये वारहेड जमिनीवर दोन किलोमीटर अंतरापर्यंत आदळले होते. डीआरडीओच्या उच्च अधिकार्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तान त्याच्या चाचणीत पूर्णपणे अपयशी ठरला होता.
अग्नी-5 च्या यशस्वी चाचणीमुळे पाकिस्तान आणि चीनमध्ये खळबळ उडणे स्वाभाविक होते. चिनी सैन्याने तर 7-8 मार्चच्या रात्री मलाक्का सामुद्रधुनी ओलांडताना अग्नी-5 चाचणीचे निरीक्षण करण्यासाठी त्यांची दोन गुप्तचर जहाजे हिंदी महासागरात तैनात केल्याचे समोर आले आहे. याखेरीज चीनचे गुप्तहेर जहाज शियांग यांग हाँग 01 बंगालच्या उपसागरात तळ ठोकून आहे. हे कथित संशोधन जहाज विशाखापट्टणमपासून काही नॉटिकल मैल अंतरावर आहे.
मरिन ट्रॅफिक रिपोर्टनुसार, जियांग यांग हाँग 01 हे चीनच्या किआंगदाओ बंदरातून गेल्या 23 फेब्रुवारीला निघाले होते. हे जहाज रविवारी बंगालच्या उपसागरात दाखल झाले होते. याआधीही जेव्हा जेव्हा भारत क्षेपणास्त्राची चाचणी घेणार होता, तेव्हा चीनची गुप्तचर जहाजे पाळत ठेवण्यासाठी येत होती. ही चिनी गुप्तचर जहाजे पीएलए मिलिटरीद्वारे चालवली जातात आणि नागरी आणि लष्करी दोन्ही कारणांसाठी वापरली जाऊ शकतात. अग्नी -4 क्षेपणास्त्राची पहिली चाचणी 2020 मध्ये झाली होती. मालदीवमध्ये मुइज्जू सरकार आल्यापासून हिंदी महासागरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. मालदीवने चीनसोबत गुप्त लष्करी करार केला आहे. एवढेच नाही तर भारतीय जवानांनी परत पाठवण्यास सुरुवात केली आहे. भारतीय नौदल हिंद महासागरातील दोन्ही चिनी हेरगिरी जहाजांवर लक्ष ठेवून आहे.
पूर्व लडाखमधील तणाव अद्याप निवळलेला नसताना भारताने केलेली अग्नी-5ची यशस्वी चाचणी अनेकार्थांनी महत्त्वाची आहे. हे क्षेपणास्त्र केवळ आण्विक होलोकॉस्ट घडवण्यास सक्षम नाही, तर शत्रूच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेला चकवा देण्याची क्षमताही त्यामध्ये आहे. एमआयआरव्ही तंत्रज्ञान पहिल्यांदा अमेरिकेने 1960 मध्ये शीतयुद्धाच्या काळात विकसित केले होते आणि 1970 च्या दशकात ते पहिल्यांदा तैनात करण्यात आले होते. यानंतर सोव्हिएत युनियनने या तंत्रज्ञानावर प्रभुत्व मिळवले. या तंत्रज्ञानाचा वापर लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांमध्ये करण्यात येतो. विशेष म्हणजे यामध्ये प्रत्येक वॉरहेडला वेगवेगळे लक्ष्य भेदण्यासाठीच प्रोग्रॅमिंग करण्याची क्षमता यामध्ये आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अग्नी 5 या क्षेपणास्त्रामध्ये विविध शस्त्रास्त्रे नेता येत असल्यामुळे खर्च कमी होतो.
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली 1980 च्या दशकात भारताने एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम हाती घेतला आणि त्या अंतर्गत अग्नी क्षेपणास्त्रावर काम सुरू झाले. अग्नी- 1 या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 800 किलोमीटर इतकी होती. ती वाढत वाढत आता पाच ते सात हजार किलोमीटरपर्यंत पोहोचली आहे. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे अग्नी-5 मधील एमआयआरव्ही टेक्नॉलॉजी ही स्वदेशी बनावटीची आहे.
भारत अलीकडील काळात संरक्षण क्षेत्रामध्ये स्वदेशीकरणावर विशेष भर देत आहे. अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने स्वदेशीकरणाला मोठी चालना दिली आहे. आता डीआरडीओही याबाबत वेगाने पावले टाकत आहे. अग्नी-5 ला एमआयआरव्ही तंत्रज्ञानाचा साज चढवून डीआरडीओने क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. या स्वदेशीकरणामागचे कारण म्हणजे इतर राष्ट्रांवरील अवलंबित्व हे युद्ध काळामध्ये अडचणीचे ठरू शकते. भारताने मागील युद्धांमध्ये याचा अनुभव घेतलेला आहे. त्यामुळेच संरक्षण साधनसामग्रीमध्ये अधिकाधिक स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापरावर भारताचा भर आहे. अग्नी-5 क्षेपणास्त्र लाँच करण्यासाठी मोबाईल लाँचर्सचा वापर केला जातो. हे क्षेपणास्त्र ट्रकवर चढवून कोणत्याही ठिकाणी नेले जाऊ शकते.