खिचडीपासून विद्यार्थ्यांची होणार सुटका; पाककृती सूचविण्यासाठी तज्ज्ञांची समिती

खिचडीपासून विद्यार्थ्यांची होणार सुटका; पाककृती सूचविण्यासाठी तज्ज्ञांची समिती
Published on
Updated on

रायगड : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील शाळांमध्ये पोषण आहार म्हणून दिल्या जाणाऱ्या खिचडीपासून विद्यार्थ्यांची सुटका होण्याची चिन्हे आहेत. पोषण आहारात स्थानिक अन्नपदार्थ, तृणधान्य, अन्य पदार्थांचा समावेश करून आहाराचा दर्जा आणि पौष्टिकता वाढवण्यासाठी, सध्याच्या पाककृतींमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. ज्येष्ठ शेफ विष्णू मनोहर यांच्यासह शिक्षण, हॉटेल, संशोधन, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचा समितीत समावेश आहे. शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला.

केंद्र शासनाने स्थानिक उपलब्ध होणाऱ्या स्थानिक अन्नपदार्थ, तृणधान्य, अन्य पदार्थांचा समावेश करण्याच्या शक्यता पडताळून पाहण्याच्या सूचना दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी आरोग्य, आहार, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात आली आहे. प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये ज्येष्ठ शेफ विष्णू मनोहर, कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्ज्वल नागेश्वर, आघारकर संशोधन संस्थेतील प्रसाद कुलकर्णी, आहारतज्ज्ञ पूनम कदम, व्यापारी महासंघाचे कार्यवाह नितीन वाळके, पोषणतज्ज्ञ डॉ. अर्चना ठोंबरे, महाराष्ट्र हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी संस्थेतील प्रतिनिधी, पोषणशक्ती निर्माण योजनेचे अधीक्षक वैभव बारेकर, राज्य समन्वय अधिकारी देविदास कुलाळ यांचा समावेश आहे.

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार अधिक पौष्टिक, रुचकर व दर्जेदार होण्यासाठी वेगवेगळ्या पाककृती सुचवणे, पाककृतीतील धान्यादींचे प्रमाण निश्चित करून देणे, विद्यार्थ्यांच्या शरीरातील लोहाचे प्रमाण वाढणे आणि बॉडी मास इंडेक्स सुधारण्याच्या दृष्टीने आहाराच्या बदलाबाबत उपाययोजना सुचवणे, स्थानिक पातळीवरील अन्नधान्य, भाज्या, फळे आदींवर आधारित पाककृतींचा समावेश करण्याबाबत शिफारस करणे. तांदूळ आणि तृणधान्यापासून मुख्य आहाराशिवाय अधिक प्रक्रिया न करता तयार होणारे प्रथिने आणि जीवनसत्वयुक्त पदार्थ सुचवणे, अन्य राज्यातील उपक्रमांचा अभ्यास करून ते राज्यात राबवण्याबाबत अभिप्राय देणे, प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांना आहार उपलब्ध होईल यासाठी सर्व बाबींचा विचार करून धोरणात्मक उपाययोजना सुचवणे अशी समितीची कार्यकक्षा निश्चित करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांच्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी जास्त

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या पाककृतीची निश्चिती २०११ मध्ये करण्यात आली आहे. मात्र गेल्या काही वर्षांत प्रसिद्ध झालेल्या अहवालातून विद्यार्थ्यांचा बॉडी मास कमी जास्त असणे, विद्यार्थ्यांच्या शरीरामध्ये लोहाचे प्रमाण कमी जास्त असणे आदी बाबी निदर्शनास आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news