

वय वाढल्यानंतर पोटाशी निगडित समस्यांचे प्रमाण वाढते. दैनंदिन वेळापत्रक आणि आहार याच्यामध्ये काही बदल केल्यास या आजारात फायदा होतो. कोणत्याही विशिष्ट आजारात काही आहारांबाबतची काही पथ्ये पाळल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो आणि निरामय आरोग्याची ती गुरूकिल्ली ठरू शकते.
व्यक्तीचे वय वाढले की आपल्या आतड्याच्या अंतःत्वचेला छोटे छोटे फोड येतात. यालाच डायव्हर्टिक्युला म्हणतात. पोटात अशा प्रकारचे फोड होण्याच्या या त्रासाला डायव्हर्टिक्युलायटिस असे म्हणतात. त्यामुळे येणारी सूज किंवा होणारा संसर्ग यांच्यामुळे डायव्हर्टिक्युलायटिस होतो. या आजारात नॉशिया, उल्टी, ब्लॉटिंग, ताप येणे, पोटात वायू होणे किंवा जुलाब आदी लक्षणे दिसून येतात. ज्यांच्या आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता असते त्यांना हा त्रास अधिक प्रमाणात होऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. या त्रासाची विशेष लक्षणे पाहायला मिळत नाहीत, त्याचा विशेष त्रासही होत नाही. पण, काही वेळा परिस्थिती गंभीर स्वरूप धारण करते तेव्हा मात्र यावर उपाययोजना कऱणे आवश्यक असते. औषधोपचार आणि गंभीर परिस्थितीत शस्त्रक्रियेचा पर्याय वापरला जातो.
डायव्हर्टिक्युलायटिसमध्ये त्रासदायक लक्षणे दिसत असतील, तर उपचाराचा भाग म्हणून डॉक्टर सर्वसाधारणपणे लिक्विड डायव्हर्टिक्युलायटिस डाएट म्हणजेच पथ्याहार करण्यास सुचवतात. त्यात पुढील गोष्टींचा समावेश होतो:
पाणी, फळांचा रस, रसदार पदार्थ.
फळांच्या रसांची कँडी ः असे आहारपथ्य पाळल्यानंतर काही काळाने रुग्णांना सामान्य आहार घेण्यास सांगतात. त्यात अतितंतुमय पदार्थ खाण्यापेक्षा कमी तंतुमय पदार्थ असणारे पदार्थ सुरुवातीला आहारात घेण्याचा सल्ला देतात. तंतुमय पदार्थांमुळे पचन क्रिया सुलभतेने पार पडते. त्यामुळे पचनसंस्थेवर दबाव कमी पडतो. तंतुमय पदार्थांचा समावेश असलेला आहार घेतल्यास या आजारावर नियंत्रण ठेवता येऊ शकते, असे अभ्यासातूनही स्पष्ट झाले आहे.
51 वर्षांपेक्षा कमी वयाच्या महिलांनी प्रतिदिवस 25 ग्रॅम आणि त्यापेक्षा अधिक वयोमान असणार्या महिलांनी 21 ग्रॅम इतके तंतुमय पदार्थांचे सेवन केले पाहिजे. तर पुरुषांमध्ये 51 पेक्षा कमी वयाच्या पुरुषांनी प्रतिदिन 38 ग्रॅम आणि त्यापेक्षा अधिक वय असणार्या पुरुषांनी 30ग्रॅम इतके तंतुमय पदार्थ आहारात समाविष्ट केले पाहिजेत.
नव्या संशोधनानुसार, ज्या व्यक्तींना डायव्हर्टिक्युलायटिस चा त्रास आहे त्यांना पचण्यास कठीण असलेले पदार्थ आहारातून वगळण्यास सांगितले जातात. काही बियावर्गीय धान्ये, मका हे व्यर्ज करण्यास सांगतात कारण आतड्यातील फोडांमध्ये हे पदार्थ अडकू शकतात. त्यामुळे आतड्याला सूज येऊ शकते, असे सांगितले जात होते. मात्र, नव्या संशोधनानुसार विविध प्रकारच्या बियांमध्ये तंतुमय पदार्थ असतात त्यामुळे डायव्हर्टिक्युलायटिस झालेल्या व्यक्तींसाठी बियावर्गीय धान्ये आहारात घेतल्यास चालू शकतात.