

Stock Knowledge : पेनी स्टॉक्स म्हणजे ज्या समभागांचे मूल्य प्रती शेअर पाच-दहा रुपयांपेक्षा कमी असते आणि ज्यांच्याकडे फारसे कोणाचे लक्ष नसते आणि त्यांची फारशी उलाढालदेखील होत नाही, असे समभाग. परंतु अचानक हे शेअर आपला आळस झटकतात आणि लांब उडी मारून कोठल्या कोठे पोचतात. अल्पावधीत पेनी स्टॉक्सने घेतलेली विक्रमी झेप पाहता, आपण त्याला छुपे रुस्तम असेही म्हणू शकतो. पण पेनी स्टॉक्स हे कमी किंमत, अधिक जोखमीचे आणि प्रचंड अनिश्चितता असणारे स्टॉक्स असतात.
Stock Knowledge : शेअर ट्रेडर्सचा द़ृष्टिकोन
पेनी स्टॉकसंदर्भात शेअर ट्रेडर्सचा द़ृष्टिकोन हा वेगवेगळा राहू शकतो. मोठे ट्रेडर्स हे केवळ मोठ्या कंपनीतच गुंतवणूक करतात आणि ते पेनी स्टॉक्सकडे पाहतदेखील नाही. त्यांच्या नजरेत शेअर बाजार किंवा लार्ज कॅप शेअर हे दमदार असतात. मध्यम स्वरूपाच्या ट्रेडर्सकडे फारसे भांडवल नसते; परंतु बाजारातून नफा काढण्याइतपत त्यांच्याकडे पैसा असतो. या ट्रेडर्सची रुची ही मिडकॅप किंवा स्मॉलकॅप शेअरमध्ये अधिक असते. हे ट्रेडर्स स्मॉलकॅपमध्ये गुंतवणूक करून काही प्रमाणात जोखीम उचलण्याची क्षमता ठेवतात. यानंतर नंबर लागतो तो स्मॉल ट्रेडर्स किंवा ठोक ट्रेडर्सचा. त्यांची भूमिका ही संधिसाधू ट्रेडर्सप्रमाणे असते. हे ट्रेडर्स कधीतरी भांडवल बाजारात टाकतात आणि सर्व प्रकारच्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात. हे सामान्य फायद्यातूनही समाधानी राहतात. ज्या श्रेणीत फायदा दिसत असतो, तेथे थोडाफार पैसा लावून ते नफा कमवत असतात.
पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करणारी मंडळी बाजाराचा आनंद घेतात. म्हणजेच त्यांना फायद्याशी काही देणेघेणे नसते. त्यांना खूप नाही पण दोन-चार हजार रुपये निघाले तरी ते समाधानी असतात. पेनी स्टॉक्स हे स्वस्त असतात. त्यामुळे अशा गुंतवणूकदारांना कमी पैशात अधिक शेअर्स मिळतात. जर लहान शेअरने मोठी उडी मारली तर गुंतवणूकदारांची बल्ले बल्ले होते.
Stock Knowledge : गुंतवणूक कशी असते?
गुंतवणूक करण्याचा सल्ला हा सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर किंवा सेबीकडे नोंदणी असलेला ब्रोकरच देऊ शकतो. परंतु कमी किंमत, अधिक जोखीम आणि खूपच अनिश्चितता असणार्या शेअरबाबत स्वत:च अभ्यास करणे गरजेचे आहे. या आधारावर गुंतवणूक केल्यास चांगला लाभ मिळण्याची शक्यता अधिक राहते.
Stock Knowledge : चांगला परतावा
कोव्हिडोत्तर काळात पेनी स्टॉक्सनी दमदार परतावा दिला आहे. सुमारे शंभर शेअर्सनी तर हजार पटीपेक्षा अधिक परतावा दिला आहे, तर काही पेनी स्टॉक्सने पाच हजार टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे.
Stock Knowledge : पेनी स्टॉक्स जोखमीचे
पेनी स्टॉक्स हे खूपच जोखमीचे असतात. त्यामुळे त्यात गुंतवणूक करताना कंपनीची कामगिरी, रिकॉर्ड, व्यवहार, उत्पादन, सेवा आदींची माहिती घेणे गरजेचे आहे. संपूर्ण माहिती घेतल्यानंतरच त्यात गुंतवणूक करणे हिताचे ठरू शकते. अन्यथा पेनी स्टॉक्समुळे राजावरून रंक होण्यात थोडाही वेळ लागणार नाही. आपल्यात जोखीम घेण्याची क्षमता आहे, तर आपण पेनी स्टॉक्सबाबत इंटरनेटवर सर्च केल्यास आपल्याला मोठी यादी पाहावयास मिळेल. पेनी स्टॉकमध्ये बराच काळापासून ट्रेडिंग होत नसल्याचेही दिसेल. जर असेल तर किती शेअरची खरेदी विक्री होत आहे, हे पाहता येईल. ज्या कंपनीचे पेनी स्टॉक्स खरेदी करायचे असतील; त्या कंपनीचे उत्पादन, सेवा, मागणी याचे आकलन करणे गरजेचे आहे. या गोष्टींची पडताळणी करूनच आपण एखाद्या नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागारांशी चर्चा करून पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची जोखीम उचलू शकता.
जगदीश काळे