

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (CUSAT) मध्ये शनिवारी (दि.२६) संध्याकाळी एका संगीत कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत चार विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून सुमारे ६४ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, केरळचे उच्च शिक्षण मंत्री आर बिंदू यांनी विभागाचे प्रधान सचिव आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंना चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. (CUSAT University Stampede)
मृत्यू झालेल्या चार विद्यार्थ्यांमध्ये दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश आहे. त्यातील तीन अभियांत्रिकीचे द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत. अथुल थंपी, अॅन रुफ्ता आणि सँड्रा थॉमस अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. पार्श्वगायिका निखिता गांधी यांचा समावेश असलेली हा कार्यक्रम टेक फेस्टदरम्यान विद्यापीठाच्या ओपन-एअर ऑडिटोरियममध्ये आयोजित करण्यात आला होता. (CUSAT University Stampede)
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी कोची विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. "या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. चार विद्यार्थ्यांचे प्राण गमावलेल्यांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो. जखमींसाठी उपचार करण्यात येत आहे," असे त्यांनी एक्सवर लिहिले आहे. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनीही शोक व्यक्त केला आहे.
हेही वाचा :