सेरेनाला धक्का, नदाल दुसर्या फेरीत
विम्बल्डन : वृत्तसंस्था जगातील माजी अव्वल महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने तब्बल 364 दिवसांनंतर महिला एकेरीत पुनरामन केले. मात्र, आतापर्यंत 23 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकलेल्या सेेरेनाला विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागल्याने 23 व्या ग्रँडस्लॅम जेतेपदाची वाटचाल संपुष्टात आली. तर पुरुष एकेरीत स्पेनच्या राफेल नदालने संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसर्या फेरीत प्रवेश केला.
सेरेनाने यापूर्वी आपला शेवटचा एकेरीचा सामना गतसाली 29 जून रोजी खेळला होता. मात्र, त्यावेळी पहिल्याच सेटमध्ये जखमी झाल्याने सेरेनाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले होते. सातवेळा विम्बल्डनचे जेतेपद पटकावणार्या 40 वर्षीय सेरेनाला यावेळी पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. सेरेनाला 115 व्या क्रमांकाच्या फ्रान्सच्या हार्मोनी टेनकडून 7-5, 1-6, 7-6 (10-7) असा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात सेरेनाला सुरुवातीपासूनच लय सापडली नाही. याशिवाय तिच्या फटक्यांमध्येही अचूकता नव्हती. यामुळेच अनुभवी सेरेनाला पराभवाला सामोरे जावे लागले.
दुसर्या फेरीत टेनची गाठ स्पेनच्या 32 व्या मानांकित सारा सोरिबेस टोर्मोशी पडणार आहे. साराने पहिल्या फेरीत अमेरिकेच्या क्वालिफायर क्रिस्टिना मॅकहोलचा 6-2, 6-1 असा पराभव केला. दरम्यान, नंबर वन खेळाडू पोलंडच्या इगा स्वातेकने दुसर्या फेरीत प्रवेश केला. तिने क्रोएशियाच्या जाना फेटला अवघ्या 74 मिनिटांत 6-0, 6-3 असे एकतर्फी पराभूत केले. पुरुष एकेरीच्या एका महत्त्वपूर्ण सामन्यात दुसर्या मानांकित राफेल नदालने अर्जेंटिनाच्या फ्रान्सिस्को सेरेडिनाला 6-4, 6-3, 3-6, 6-4 असे पराभूत करत दुसर्या फेरीत प्रवेश केला.