यशस्वी जैस्वालची कासवछाप खेळी

यशस्वी जैस्वालची कासवछाप खेळी

बंगळूर ; वृत्तसंस्था : रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीत बंगळूरमध्ये मुंबई आणि उत्तर प्रदेश यांच्यात सामना होत आहे. पहिल्या डावात 393 धावा करून मुंबईने सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशचा संघ पहिल्या डावात 180 धावांत पॅव्हेलियनमध्ये परतला. पहिल्या डावात यशस्वी जैस्वालने 272 चेंडूंत शतकी खेळी करत संघाला चांगल्या स्थितीत पोहोचवले होते.

मात्र, हाच यशस्वी जैस्वाल दुसर्‍या डावात कासवाच्या गतीला लाजवेल अशा गतीने फलंदाजी करत होता. दुसर्‍या बाजूला त्याच्या जोडीला सलामीला आलेल्या पृथ्वी शॉने मुंबईच्या 66 धावांच्या सलामीमधील 64 धावा एकट्यानेच केल्या होत्या. दरम्यान, मुंबईने या सामन्यात मजबूत पकड बनवली असून त्यांनी तिसर्‍या दिवसअखेरीस 1 बाद 133 धावा केल्या होत्या. मुंबईकडे आता 346 धावांची आघाडी आहे.

मुंबईने पहिल्या डावात 393 धावा केल्या होत्या. त्यात सलामीवीर यशस्वी जैस्वालने शतकी योगदान दिले. त्यानंतर तुषार देशपांडे, मोहित अवस्थी आणि तनुष कोटियान यांनी प्रत्येकी 3 विकेटस् घेत उत्तर प्रदेशचा पहिला डाव 180 धावांत गुंडाळला. 213 धावांची मोठी आघाडी घेतलेल्या मुंबईने सामन्याच्या तिसर्‍या दिवशी आपला दुसरा डाव खेळण्यास सुरुवात केली. मात्र यादरम्यान, एक अजब प्रकार घडला. पहिल्या डावात शतकी खेळी करणार्‍या यशस्वी जैस्वालला तब्बल 53 चेंडू खेळूनदेखील आपले खाते उघडता आले नव्हते.

जैस्वालच्या या कासवापेक्षा संथ गतीच्या खेळीमुळे एक अनोखा विक्रम प्रस्थापित झाला. यापूर्वी 1888 मध्ये ऑस्ट्रेलियन विरुद्ध नॉर्थ सामन्यात ऑल्ड ट्राफोर्डवर पी. एस. मॅकडोनेल यांनी 86 धावांच्या भागीदारीमधील 82 धावा केल्या होत्या. तर ए.सी. बॅनरमन यांनी 4 धावा केल्या होत्या. या भागीदारीत मॅकडोनेल यांचा वाटा 95.35 इतका होता. तर आजच्या रणजी ट्रॉफीच्या मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश सेमीफायनलमध्ये पृथ्वी शॉचा वाटा 96.97 इतका होता. त्याने भागीदारीतील 66 पैकी 64 धावा एकट्याने केल्या होत्या. तर यशस्वी जैस्वालला 66 पैकी एकही धाव करता आली नव्हती.

दुसर्‍या बाजूने 71 चेंडूंत 64 धावा करणारा पृथ्वी शॉ बाद झाला. तरीदेखील यशस्वी जैस्वालला आपले खाते उघडता आले नव्हते. शॉ बाद झाल्यानंतर आलेल्या अमन जाफरने देखील आपले खाते उघडले. अखेर 22 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर चौकार मारत यशस्वी जैस्वालने आपले खाते उघडले. जैस्वालचा 54 वा चेंडू होता. यानंतर या दोघांनी दुसर्‍या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरुवात केली. दोघांनी नाबाद राहात मुंबईला 1 बाद 133 धावांवर आणून ठेवले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news