

चेम्सफर्ड ; वृत्तसंस्था : भारतीय महिला क्रिकेट संघाला 2019 नंतर आपली पहिली टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका जिंकायची आहे.तर, त्यांना बुधवारी होणार्या भारत-इंग्लंड मधील तिसर्या आणि निर्णायक सामन्यातील सर्व खेळाडूंकडून योगदानाची गरज आहे.
भारत-इंग्लंड यांच्यामधील रविवारी झालेल्या दुसर्या टी-20 सामन्यात भारताने चांगले क्षेत्ररक्षण तसेच स्पिनर पूनम यादव आणि दीप्ती शर्मा यांच्या गोलंदाजीच्या जोरावर विजय मिळवत मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. आता हरमनप्रीत कौर आणि त्यांच्या खेळाडूकडे 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदा टी-20 मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे.
इंग्लंडचा संघ गेल्या सामन्यात चांगल्या स्थितीत होता. मात्र, तरीही त्यांनी सामना गमावला. त्यामुळे ते ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करतील. त्यांचा प्रयत्नदेखील सर्व विभागात चांगली कामगिरी करून मालिका जिंकण्याचा असणार आहे. भारताच्या विजयात शेफाली वर्मा आणि स्पिनर्सनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
त्यामुळे आता मध्यक्रमातील फलंदाजांसोबत जलदगती गोलंदाजांना देखील चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. हरमनप्रीत गेल्या लढतीत तिसर्या स्थानावर फलंदाजीस उतरली होती आणि तिने काही धावादेखील केल्या. त्यामुळे या लढतीत संघाला तिच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.