

सिडनी ; वृत्तसंस्था : इंग्लंड विरुद्ध होणार्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यात अजिंक्य रहाणे आणि ईशांत शर्मा यांना स्थान देण्यात आलेले नाही. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉग यांनी भारतीय निवड समितीच्या निर्णयाचे तोंडभरून कौतुक केले आहे.
ब्रॅड हॉग यांच्या म्हणण्यानुसार भारतीय निवड समितीचा निर्णय अत्यंत योग्य आहे. अजिंक्य रहाणे आणि ईशांत शर्मा साजेशी कामगिरी करत नव्हते. तसेच ते म्हातारे होत आहेत. अशावेळी युवांना संधी देणे योग्य ठरते. कारण संघातील अनुभवी खेळाडूंसोबत त्यांना खेळण्याची संधी मिळते, असे ब्रॅड हॉग म्हणाले.
ब्रॅड हॉग यांनी भारतीय संघात श्रेयस अय्यर आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या निवडीवर आनंद व्यक्त केला आहे. श्रेयस अय्यर भारतीय संघासाठी बराच काळ खेळणारा खेळाडू आहे. तो विराट कोहलीसोबत बॅटिंग करेल आणि येत्या काळात यशस्वी फलंदाज म्हणून समोर येईल. तर प्रसिद्ध कृष्णाच्या बाबतीतही तसेच आहे. त्याला बुमराह आणि शमी यांच्यासोबत गोलंदाजी करता येईल, असे ब्रॅड हॉग म्हणाले.
अजिंक्य रहाणेला आयपीएलमध्ये दुखापत झाली होती. त्यामुळे काही आठवडे तो क्रिकेटपासून दूर राहणार आहे. तसेच रहाणेचा फॉर्मदेखील चिंतेचा विषय ठरला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातही रहाणेची निवड झाली नव्हती. तर ईशांत शर्मा देखील खराब कामगिरीचा शिकार ठरला आहे. त्यामुळे संघात जागा प्राप्त करू शकलेला नाही.
भारतीय संघाला 1 जुलै रोजी इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळायचा आहे. गेल्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील हा एक शिल्लक राहिलेला सामना आहे जो कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आला होता. भारतीय संघाची घोषणा झाली असून, काऊंटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करणार्या चेतेश्वर पुजाराची संघात निवड झाली आहे.
इंग्लंड विरुद्धच्या कसोटीसाठीचा भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), के.एल. राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, केएस भरत, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा