

पुढारी ऑनलाईन डेस्क : पाकिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडला मार्क चॅपमनशिवाय खेळावे लागेल. फॉर्ममध्ये असलेला हा फलंदाज हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरण्यात अपयशी ठरला आहे. नेपियरमध्ये झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात चॅपमनने वादळी शतक झळकावले होते. मात्र, क्षेत्ररक्षण करताना त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. त्यानंतर तो हॅमिल्टन येथील दुसरा सामना खेळू शकला नाही. ब्लॅककॅप्सने या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.
शनिवारी (5 एप्रिल) माउंट मौंगानुई येथे होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी चॅपमन तंदुरुस्त असेल अशी अपेक्षा होती परंतु शुक्रवारी सराव करताना 30 वर्षीय चॅपमन फिटनेस चाचणीत अपयशी ठरला. अशा परिस्थितीत, किवी संघ व्यवस्थापनाने कोणताही धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला. नेपियरमधील पहिल्या वनडेमध्ये चॅपमनने 111 चेंडूत 6 षटकार आणि 13 चौकारांच्या मदतीने 132 धावा फटकावल्या होत्या. या वादळी खेळीसाठी त्याला प्लेअर ऑफ द मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
चॅपमन बाहेर पडल्याने टिम सेफर्ट संघासोबत राहील. जर तिस-या वनडेसाठी किवी संघात बदल झाल्यास सेफर्टला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध 4-1 अशा फरकाने जिंकलेल्या टी-20 मालिकेत सेफर्टला मालिकावीराचा पुरस्कार मिळाला होता. या 30 वर्षीय खेळाडूला आतापर्यंत न्यूझीलंडकडून फक्त तीन एकदिवसीय सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.
चॅपमनने गेल्या पाच वर्षांपेक्षा जास्त काळ एकदिवसीय सामना खेळलेला नव्हता. त्याने 2019मध्ये नेल्सन येथे श्रीलंकेविरुद्ध शेवटची वनडे खेळली होती. त्यानंतर तो नेपियर येथे गेल्या आठवड्यात पाकिस्तानविरुद्धच्या 50-50 षटकांच्या सामन्यात खेळताना दिसला. मात्र, मालिकेतील पुढच्याच सामन्यातून त्याला बाहेर पडावे लागले. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज बेन सीयर्सला संधी मिळाली. दरम्यान, या मालिकेसाठी विल यंगलाही प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. 23 वर्षीय कॅन्टरबरीचा फलंदाज रिस मार्यूला पदार्पणाची संधी मिळाली. त्याने निक केलीसोबत सलामी दिली. पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी सराव करताना हाताला फ्रॅक्चर झाल्याने टॉम लॅथम संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला.