मुंबई : वृत्तसंस्था
कुलदीप यादव, खलील अहमद आणि शार्दूल ठाकूर या त्रिकुटाने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सला 44 धावांनी धूळ चारली. आयपीएलमधील आपल्या दुसर्या विजयाची नोंद केली. आता चार सामन्यांतून दिल्लीचे चार गुण झाले असून कोलकाताचे पाच सामन्यांतून सहा गुण झाले आहेत. अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी हे दिल्लीच्या विजयाचे मुख्य वैशिष्ट्य ठरले. 19.4 षटकांत कोलकाताचा सगळा संघ 171 धावांमध्ये गारद झाला.
216 धावांचे लक्ष्य समोर ठेवून मैदानात उतरलेल्या कोलकाताची सुरुवात खराब झाली. अजिंक्य रहाणे आणि व्यंकटेश अय्यर हे दोन्ही सलामीवर स्वस्तात बाद झाले. रहाणेने 8 तर अय्यरने 18 धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यर याने मात्र एक बाजू लावून धरली होती. 11 षटकांचा खेळ पूर्ण झाला तेव्हा कोलकाताने 101 धावांपर्यंत मजल मारली होती. डावखुर्या नितीश राणासोबत श्रेयसची जोडी छान जमलेली असताना प्रतिषटक आवश्यक धावगती पोहोचली होती 13 वर. ललित यादवच्या फिरकीने ही जोडी फोडली.
ललितचा फुलटॉस नितीशने उंचावरून फटकावला आणि पृथ्वी शॉ याने धन्यवाद म्हणत ही भेट आनंदाने स्वीकारली. नितीशने 20 चेंडूंत 30 धावा कुटल्या त्या तीन षटकारांसह. त्याची जागा घेतली आंद्रे रसेलने. 12 षटकांच्या खेळानंतर कोलकाताने तीन गडी गमावून 110 धावा केल्या होत्या. त्यानंतर कोलकाताचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले आणि विजय दिल्लीच्या आवाक्यात येत गेला. दिल्लीकडून कुलदीप यादवने चार, खलील अहमदने तीन, शार्दूल ठाकूरने दोन तर ललित यादवने एक गडी टिपला.
त्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने सामुदायिक प्रयत्नांचे अफलातून प्रदर्शन घडवताना निम्मा संघ गमावून 215 धावांचा डोंगर उभारला. दिल्लीकडून पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर यांनी 93 धावांची खणखणीत सलामी दिली. पृथ्वीने आक्रमक फलंदाजी करताना 29 चेंडूंत 51 धावा कुटल्या. 7 चौकार व 2 षटकार हे त्याचे मुख्य फटके. दुसरीकडे वॉर्नरदेखील कोलकाताच्या गोलंदाजीवर तुटून पडला होता. त्याने 45 चेंडूंत 61 धावांचे योगदान दिले. 6 चौकार व दोन षटकार खेचून त्याने रसिकांचे मनोरंजन केले. मग कर्णधार ऋषभ पंत याने 27 धावांची आकर्षक खेळी केली.
ललित यादव मात्र 1 धावा करून तंबूत परतला आणि रोवमन पॉवेल यानेही त्याचाच कित्ता गिरवला. पॉवेलने 8 धावा केल्या. त्यानंतर अक्षर पटेल आणि शार्दूल ठाकूर या जोडगोळीने कोलकाताच्या गोलंदाजीची कत्तल केली. पटेलने 14 चेंडूंचा सामना 2 चौकार आणि एका षटकारासह 22 धावा ठोकल्या. शार्दूलने तर कमाल केली. अवघ्या 11 चेंडूंत त्याने 29 धावा झोडताना एक चौकार लगावला तर तीनदा चेंडू थेट प्रेक्षकांत भिरकावला.
दिल्लीच्या फलंदाजांनी असा जबरदस्त हल्लाबोल केला की, त्यामुळे कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यर हा पुरता गोंधळून गेला होता. त्याने उमेश यादव, पॅट कमिन्स, रसिक सलाम, वरुण चक्रवर्ती, सुनील नारायण, आंद्रे रसेल आणि व्यंकटेश अय्यर असे तब्बल सात गोलंदाज वापरले. तरीदेखील दिल्लीच्या धावसंख्येला वेसण घालण्याची किमया सुनील नारायण वगळता कोणालाच करता आली नाही. कोलकाताकडून सुनील नारायणने दोन, तर उमेश यादव, वरुण चक्रवर्ती आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी एक गडी टिपला. सुनील नारायण याने आपल्या चार षटकांत फक्त 21 धावा दिल्या.