

उदय बिनीवाले :
युनायटेड कप सांघिक टेनिस स्पर्धेच्या दुसर्या दिवशी यजमान ऑस्ट्रेलियाची स्थिती निराशाजनक असल्याचे चित्र पाहायला मिळाले. इंग्लंड संघाविरुद्ध तीन सामने हरल्यामुळे स्पर्धेतून बाद होण्याची नामुष्की त्याच्यावर ओढविली आहे. ग्रीस संघाने बल्गेरिया विरुद्ध 4-1 असा विजय मिळवला. फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात चुरस असून प्रत्येक संघाने 2-2 विजय प्राप्त केले आहेत. इटली वि. ब्राझील 3-2 अशी अटीतटीची लढाई असून अमेरिकेने झेकोस्लोव्हाकियाचा 4-1 असा फडशा पाडला आहे.
सुरुवातीच्या दोन दिवसांत टेनिस शौकिनांना जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. कारण मेटेओ बेरेट्टीनी, केम्रॉन नुरी, पेट्रा क्विटोवा, मारिया सक्कारी अशा दिग्गज खेळाडूंनी आपल्या रॅकेटच्या जादुई फटक्यानी प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.
ज्या खेळाडूंचे शुक्रवारी सामने नव्हते त्यांनी निसर्गरम्य ठिकाणी जाऊन सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घेतला. राफेल नदाल, पॉला बडोसा आणी स्पेन संघाने सिडनीच्या सुंदर ऑपेरा हाऊस परिसरात फेरफटका मारला. इगा स्विआटेक, ह्युबर्ट हरकाझ आणि पोलंड संघाच्या खेळाडूंनी ब्रिस्बेनच्या कांगारू क्लिफला भेट दिली. ग्रीगोर डीमिट्रोव्हच्या बल्गेरिया संघाने पर्थ येथील कॉटेसलो समुद्रकिनारी आनंद लुटला. बोर्ना कोरिक व क्रोशिया खेळाडूंनी स्वान नदीकिनारी नौकाविहार करून ताजेतवान राहणे पसंद केले.