कुस्तीत पुन्हा ‘सुवर्ण’ हॅट्ट्रिक; भारताच्या रविकुमार, नवीन, विनेशने लुटले सोने

कुस्तीत पुन्हा ‘सुवर्ण’ हॅट्ट्रिक; भारताच्या रविकुमार, नवीन, विनेशने लुटले सोने

बर्मिंगहॅम; वृत्तसंस्था : राष्ट्रकुल स्पर्धेत कुस्तीपटूंचा सुवर्णपदकांचा धडाका शनिवारीही सुरू राहिला. शुक्रवारी बजरंग, दीपक, साक्षी यांनी सुवर्णपदके पटकावल्यानंतर दुसर्‍या दिवशी रविकुमार, नवीन आणि विनेश यांनी भारतासाठी सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक नोंदवली. यात नवीनची कुस्ती भारतासाठी महत्त्वाची होती, त्याने पाकिस्तानी पैलवान मुहम्मद शरिफ ताहिरला हरवून सुवर्णपदकावर कब्जा केला. रविकुमारने नायजेरियाच्या, तर विनेशने श्रीलंकन मल्लाला हरवले. याशिवाय पूजा गेहलोत आणि पूजा सिहाग यांनी कांस्यपदक मिळवले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅटवरील मल्लयुद्धाची सर्वांनाच उत्सुकता होती. दोन्ही मल्ल तोडीस तोड असले, तरी भारतीय नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या नवीनने पाकिस्तानच्या मुहम्मद ताहिरचा 9-0 असा पारभव करत 74 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. पहिल्या फेरीत नवीनला फक्त दोन गुण मिळाले होते. परंतु, दुसर्‍या फेरीत दमलेल्या ताहिरवर दोनदा भारंदाज डाव टाकत सलग गुणांची कमाई केली. शेवटी नवीनने 9-0 अशी कुस्ती जिंकून भारताला बारावे सुवर्णपदक मिळवून दिले.

दोन पूजा 'कांस्य'च्या मानकरी

भारताच्या पूजा गेहलोतने स्कॉटलंडच्या ख्रिस्टलेचा 12-2 असा पराभव करत महिला 50 किलो फ्री स्टाईलमध्ये कांस्यपदक पटकावले. दिल्लीची पूजा ही पहिल्यांदाच राष्ट्रकुल स्पर्धेत खेळत होती. कुस्तीत भारताने अजून एक कांस्यपदक पटकावले. भारताच्या पूजा सिहागने ऑस्ट्रेलियाच्या नाओमी ब्रुनेचा 11-0 असे हरवून कांस्य पटकावले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news