

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात इशान किशनने दमदार खेळ केला. त्याच्या 76 धावांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने 211 धावांचा डोंगर उभा केला. पण इतके करूनही इशानला संघातील स्थानाची खात्री वाटत नाही, रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांना माझ्यासाठी वगळले जाणार नाही, असे त्याने म्हटले आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका मालिकेत रोहित शर्माला विश्रांती दिली आहे, तर लोकेश राहुलने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. लोकेश राहुल व रोहित शर्मा यांच्या पुनरागमनानंतर इशानला अंतिम 11 मध्ये खेळण्याची संधी मिळणे अवघड आहे.
पहिल्या सामन्यानंतर इशान म्हणाला, रोहित व लोकेश हे वर्ल्ड क्लास खेळाडू आहेत आणि माझ्यासाठी त्यांनी संघाबाहेर बसण्यास मी सांगू शकत नाही. अशावेळी जेव्हा संधी मिळेल, तेव्हा स्वतःला सिद्ध करण्याचे किंवा संघासाठी चांगली कामगिरी करण्याची माझी जबाबदारी आहे. त्यावर मी लक्ष केंद्रित केले आहे.
तो पुढे म्हणाला,त्यांनी संघासाठी बरेच केले आहे. त्यांनी देशासाठी किती धावा केल्यात, हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे मला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यासाठी त्यांना वगळणार नाहीत. मी माझे काम करत राहणार. खेळवायचे की नाही या गोष्टीचा विचार निवड समिती व प्रशिक्षकांनी करावा. इशान किशनने 48 चेंडूंत 11 चौकार व 3 षटकारांसह 76 धावा करून भारताचा पाया मजबूत केला.