

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलचा 18वा हंगाम सुरू असतानाच भारताचा टेस्ट ओपनर यशस्वी जैस्वालने आपल्या कारकिर्दीबाबत मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. तो लवकरच मुंबई रणजी संघाला सोडचिठ्ठी देऊन 2025-26 च्या देशांतर्गत हंगामापूर्वी गोवा संघात सामील होईल अशी माहिती मिळत आहे.
23 वर्षीय जैस्वालने मुंबईच्या आजाद मैदानावर मेहनत घेत आपल्या क्रिकेट कारकिर्दीला आकार दिला आणि भारतीय क्रिकेटमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली. मिळालेल्या माहितीनुसार, तो पुढील हंगामात गोव्याचा कर्णधार बनू शकतो आणि नेतृत्वाच्या संधीमुळेच त्याने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 2) जैस्वालने मुंबई क्रिकेट असोसिएशनला (MCA) ईमेल पाठवून नो-ऑब्जेक्शन सर्टिफिकेटची (NOC) मागणी केली होती. मेल पाठवण्यापूर्वी, त्याने एमसीए अधिकाऱ्यांशी चर्चा केली. ‘मला गोव्याकडून कर्णधारपदाची ऑफर मिळाली आहे,’ असे जैस्वालने स्पष्ट केले. यानंतर एमसीएने तासाभरातच त्याची मागणी मान्य केली आणि एनओसी दिली. या निर्णयानंतर जैस्वालचा गोव्याकडून खेळण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
मुंबई संघात अनेक स्टार खेळाडूंचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, जैस्वाल मुंबईचा कर्णधार होण्याची शक्यता खूपच कमी आहे. सध्या अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करत आहे, तर त्याच्या अनुपस्थितीत श्रेयस अय्यरचा दावा सर्वात मजबूत आहे. श्रेयस अय्यरनेही अनेक वेळा संघाचे नेतृत्व केले आहे.
रणजी ट्रॉफीमध्ये त्याने 53.93 च्या सरासरीने 863 धावा केल्या आहेत. यात चार शतके आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. तर देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 58.9 च्या सरासरीने 1,296 धावा केल्या आहेत. या काळात त्याने पाच शतके झळकावली आहेत. ज्यात एका द्विशतकाचा समावेश आहे. तर टी-20 मध्ये 136.42च्या स्ट्राईक रेटने 26 डावांत 648 धावा फटकावल्या आहेत. जैस्वालने आपल्या खेळाने मुंबई क्रिकेटमध्ये ठसा उमटवला आहे, पण आता त्याचा गोव्याकडून खेळताचा नवा प्रवास यशस्वी होईल की नाही हे येणा-या काळात स्पष्ट होईल.
गोव्यात जाऊन यशस्वीला देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगल्या संधी मिळू शकतात. त्याची अलिकडेच झालेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी झाली. त्याने पाच कसोटी सामन्यांमध्ये 43.44 च्या सरासरीने 391धावा केल्या, परंतु आयपीएल 2025 त्याच्यासाठी आतापर्यंत काही खास ठरलेले नाही. राजस्थान रॉयल्सकडून खेळताना त्याने तीन सामन्यात 11.33 च्या सरासरीने आणि 106.25 च्या स्ट्राईक रेटने 34 धावा केल्या आहेत.
जैस्वालचा हा निर्णय मुंबई संघासोबतच्या एका भावनिक पर्वाचा शेवट आहे. उत्तर प्रदेशच्या भदोहीहून आलेल्या या युवा खेळाडूने मुंबईत आपल्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याला सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागला. प्रसंगी तो अनेकदा आजाद मैदानात तंबूमध्ये झोपायचा. मात्र, त्याच्या आयुष्यात पृथ्वी शॉचे प्रशिक्षक ज्वाला सिंह आले, ज्यांनी त्याला आजाद मैदानातून उचलून आपल्या घरी आणले आणि मुलासारखे वाढवले. ज्वाला सिंह यांनी यशस्वीला शालेय क्रिकेटपासून मुंबईच्या वरिष्ठ संघापर्यंत पोहोचवण्यासाठी मोठी मदत केली. आज त्याने मुंबईला सोडण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याचा हा प्रवास संघर्ष, मेहनत आणि यशाचा एक प्रेरणादायी प्रवास आहे.