

वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आगामी काळात रंगणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाने न्यूझीलंडमध्ये दाखल होत आपल्या तयारीला वेग दिला आहे. सध्या उभय संघांत तीन अनौपचारिक सामन्यांची मालिका खेळवली जात असून, दुसऱ्या सामन्यात भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने दमदार शतक ठोकत आपली उपयुक्तता पुन्हा सिद्ध केली आहे. मात्र, याच लढतीत साई सुदर्शन आणि देवदत्त पडिक्कल यांना फलंदाजीत अपयश आले. दरम्यान, जैस्वालच्या शतकी खेळीच्या बळावर दुसऱ्या डावात भारताने न्यूझीलंडविरुद्ध भक्कम आघाडी उभारली आहे.
भारत 'अ' संघाकडून खेळताना यशस्वी जैस्वालने न्यूझीलंड 'अ'च्या गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत नेत्रदीपक खेळी साकारली. त्याने अवघ्या ११९ चेंडूंत आपले शतक पूर्ण केले. विशेष म्हणजे, आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीला साजेसा उत्तुंग षटकार खेचत जैस्वालने शतकी टप्पा गाठला. शतक झळकावल्यानंतर त्याचा आक्रमक अंदाज अधिकच खुलला आणि त्याने वेगाने धावा जमवणे सुरू ठेवले. या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात १७ आणि दुसऱ्या डावात केवळ ५ धावांवर तो बाद झाला होता. त्यामुळे त्याच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते; मात्र या शतकी खेळीने त्याने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
एकीकडे यशस्वीच्या खेळीमुळे भारतीय गोटात दिलासा मिळाला असतानाच, दुसरीकडे साई सुदर्शनच्या कामगिरीने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. सुदर्शन ३४ चेंडूंचा सामना करताना केवळ ११ धावा काढून माघारी परतला. मालिकेतील पहिल्या सामन्यातही तो पहिल्या डावात शून्यावर, तर दुसऱ्या डावात ९१ धावांवर बाद झाला होता. दुसरीकडे, या सामन्यात देवदत्त पडिक्कलला भोपळाही फोडता आला नाही. मात्र, याआधीच्या लढतीत त्याने शानदार द्विशतक झळकावले होते.
या सामन्याच्या पहिल्या डावात भारताने ३४६ धावा उभारल्या होत्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंड 'अ' संघाने पहिल्या डावात ४२४ धावांचा डोंगर रचत महत्त्वाची आघाडी घेतली होती. आता दुसऱ्या डावात भारताने २५० हून अधिक धावांची मजल मारत सामन्यात चांगली आघाडी प्राप्त केली आहे. उर्वरित फलंदाज धावसंख्येत किती भर घालतात आणि कर्णधार ध्रुव जुरेल न्यूझीलंडसमोर विजयासाठी किती धावांचे आव्हान ठेवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सामन्याचा चौथा आणि अंतिम दिवस असल्याने ही लढत अनिर्णित सुटण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.