

Yash Dayal Rape Case
जयपूर : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (RCB) संघाचा गोलंदाज यश दयाल याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. गाझियाबादनंतर आता जयपूरमध्येही त्याच्यावर एका तरुणीने बलात्काराचा गंभीर आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून जयपूरच्या सांगानेर पोलीस ठाण्यात यश दयाल विरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. (IPL 2025)
पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी ती अल्पवयीन असताना तिची ओळख यश दयालसोबत झाली होती. क्रिकेट खेळत असल्यामुळे दोघांमध्ये संपर्क वाढला. यश दयालने तरुणीला क्रिकेटमध्ये करिअर घडवण्यासाठी टिप्स देण्याच्या बहाण्याने जवळीक साधली. आयपीएल २०२५ दरम्यान सामन्यासाठी जयपूरला आला असताना, यशने तिला सीतापुरा येथील एका हॉटेलमध्ये बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला, असा आरोप तरुणीने केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून ब्लॅकमेल करून यश दयाल आपल्यावर अत्याचार करत होता, असेही पीडितेने म्हटले आहे. गुन्हा घडला त्यावेळी पीडिता १७ वर्षांची म्हणजेच अल्पवयीन होती. त्यामुळे पोलिसांनी यश दयालविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गतही गुन्हा नोंदवला आहे.
यश दयालवर अशा प्रकारचा आरोप होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी जुलै महिन्यात गाझियाबादच्या इंदिरापुरम पोलीस ठाण्यात एका तरूणीने त्याच्यावर लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी तरूणीने लग्नाचे आमिष दाखवून आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला होता.
यश दयाल हा भारतीय क्रिकेटमधील एक उदयोन्मुख वेगवान गोलंदाज आहे. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेश संघाचे प्रतिनिधित्व करतो. यश दयाल आयपीएल २०२२ आणि २०२३ मध्ये गुजरात टायटन्स संघाचा भाग होता. तर २०२४ आणि २०२५ च्या हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाकडून खेळला. २०२५ च्या विजेतेपदात त्याने ५ सामन्यांत १३ बळी घेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०२२ मध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातही त्याची निवड झाली होती. त्याला बांगलादेश आणि बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी संघात स्थान मिळाले, पण आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली नाही.