पुढारी ऑनलाईन डेस्क : Rohit Sharma WTC Record : टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात 19 सप्टेंबरपासून दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग असून दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. बांगलादेशने नुकताच पाकिस्तानचा व्हाईट वॉश करून दोन कसोटी सामन्यांची मालिका जिंकली. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावले आहे. अशा स्थितीत रोहित सेनेला सावध राहावे लागणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा टीम इंडियाच्या फलंदाजीच्या क्रमातील महत्त्वाचा दुवा आहे. त्याची बॅट चालली तर विरोधी संघाची काही कैर नसते. अलीकडे त्याने खेळण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. मैदानावर येताच तो स्फोटक फलंदाजी करतो आणि धावा पटकन करतो.
रोहित शर्माने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये आतापर्यंत एकूण 9 शतके झळकावली आहेत. आता जर त्याने बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत शतक झळकावले तर तो डब्ल्यूटीसीमध्ये 10 शतके पूर्ण करेल. आतापर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूला या स्पर्धेत 10 शतके झळकावता आलेली नाहीत. आतापर्यंत, फक्त जो रूट, मार्नस लॅबुशेन आणि केन विल्यमसन यांनी डब्ल्यूटीसीमध्ये 10 पेक्षा जास्त शतके झळकावली आहेत. रोहितला या खेळाडूंच्या क्लबमध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी आहे. शतक झळकावताच तो स्टीव्ह स्मिथला मागे टाकेल. ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या नावावर 9 शतके आहेत.
जो रूट : 16 शतके
मार्नस लॅबुशेन : 11 शतके
केन विल्यमसन : 10 शतके
रोहित शर्मा : 9 शतके
स्टीव्ह स्मिथ : 9 शतके
रोहित शर्माने 2013 साली कसोटी पदार्पण केले. यानंतर त्याने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये शतके झळकावली. पण त्यानंतर त्याला कसोटी संघात कधी स्थान मिळाळे तर कधी नाही. तो आत आणि बाहेर होत राहिला. 2019 पासून, त्याला सातत्यपूर्ण कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली. त्याने टीम इंडियासाठी आतापर्यंत 59 कसोटी सामन्यांमध्ये 4137 धावा केल्या आहेत. याशिवाय तो डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. त्याने 32 डब्ल्यूटीसीमध्ये सामन्यांमध्ये 2552 धावा केल्या आहेत, ज्यात 9 शतके आणि 7 अर्धशतकांचा समावेश आहे.