

WTC Points Table : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसर्या सामन्यात भारताने रविवारी दिमाखदार विजय मिळवला. या विजयामुळे कसोटी अजिंक्यपद (WTC) च्या नवीन चक्रात (२०२५-२७) टीम इंडियाने आपले खाते उघडले आहे. इंग्लंडचा तब्बल ३३६ धावांनी पराभव करत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. विशेष म्हणजे बर्मिंगहॅममध्ये भारताने प्रथमच विजय मिळवला आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयासह, भारतीय संघ २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. संघाला एका स्थानाचा फायदा झाला आहे. सध्याच्या जागतिक कसोटी स्पर्धेच्या चक्रात, भारतीय संघाने आतापर्यंत एकूण २ सामने खेळले. यातील एक जिंकला आहे आणि एक गमावला आहे. त्याचा पीसीटी ५० टक्के आहे. तर इंग्लंडला सामना गमावल्यामुळे पराभव सहन करावा लागला आहे आणि तो दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. २०२५-२७ च्या जागतिक कसोटी सामन्यात त्यांनी एकूण दोन सामने खेळले आहेत, ज्यामध्ये एक पराभव झाला आहे आणि एक जिंकला आहे. त्याचा पीसीटी ५० टक्के आहे. भारत आणि इंग्लंडचा पीसीटी समान आहे. अशा परिस्थितीत, आपण असे म्हणू शकतो की दोन्ही संघ समान आहेत आणि संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर आहेत.
भारताने पहिल्या डावात ५८७ धावा केल्या होत्या आणि इंग्लंडला ४०७ धावांवर गुंडाळून १८० धावांची मोठी आघाडी घेतली होती. शुभमन गिलच्या शतकाच्या मदतीने भारताने दुसरा डाव ६ बाद ४२७ धावांवर घोषित केला आणि ६०७ धावांची एकूण आघाडी मिळवून इंग्लंडसमोर ६०८ धावांचे लक्ष्य ठेवले. पाचव्या दिवशी इंग्लंडचा दुसरा डाव २७१ धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने इंग्लंडचा तब्बल ३३६ धावांनी पराभव केला.
पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे उशिरा सुरू झाला; परंतु यानंतर वेगवान गोलंदाज आकाश दीपने सुरुवातीला इंग्लंडला दोन धक्के दिले. बेन स्टोक्सने जेमी स्मिथबरोबर सहाव्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. स्टोक्सला तंबूत धाडत वॉशिंग्टन सुंदरने ही भागीदारी मोडली. लंच ब्रेकनंतर भारताने उर्वरित चार विकेट घेत दिमाखदार विजयाची नोंद केली. भारताकडून वेगवान गोलंदाज आकाश दीपने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आणि दुसऱ्या डावात सहा विकेट घेतल्या. आकाशने पहिल्या डावात चार विकेट घेतल्या होत्या. आकाश व्यतिरिक्त मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दुसऱ्या सत्रात इंग्लंडने ख्रिस वोक्स (७), जेमी स्मिथ (८८), जोश टंग (२) आणि ब्रायडन कार्स (३८) यांचे विकेट गमावले. शोएब बशीर १२ धावा काढून नाबाद परतला. इंग्लंडकडून दुसऱ्या डावात यष्टीरक्षक फलंदाज जेम स्मिथने शानदार कामगिरी केली आणि अर्धशतक झळकावले. भारत आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना १० जुलैपासून लॉर्ड्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.