

विवेक कुलकर्णी
भारतातर्फे पाच शतके, तर इंग्लंडतर्फे दोन. भारताचे सामन्यावर अधिक वर्चस्व, तर इंग्लंड यशावर क्वचित स्वार. टॉसनंतर सामन्यात वर्चस्व कोणाचे तर भारताचे... सामन्यात सर्वाधिक शतके भारताची... पण तरीही लीडस्वर जे नाट्य घडले त्याने भल्याभल्यांचे डोळे सताड उघडलेत. ‘शोले’तील गब्बर असता तर त्याने या कचखाऊ संघाला एक प्रश्न नक्की विचारला असता... ‘कितने आदमी थे?’
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात जो पराभव पत्करावा लागला त्याची क्वचितच कोणी अपेक्षा केली असेल. मुळात हा संघ अननुभवी. बुमराह, जडेजा, के. एल. राहुल वगळता फारसा कोणाला अनुभव नव्हता. त्यातही इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव 18 पैकी 10 जणांना नव्हता. त्यामुळे अपेक्षा किती ठेवावी, यावरही निश्चितच काही मर्यादा होत्या; पण प्रत्यक्ष सामन्यात पहिल्या तीन दिवसांत भारताने जो धडाकेबाज खेळ साकारला त्याला तोड नव्हती. यापूर्वी कसोटीत एकाच सामन्यात 5 शतके भारताकडून कधीच झाली नव्हती. यापूर्वी कोणत्याही भारतीय यष्टिरक्षकाने दोन्ही डावांत शतके झळकावली नव्हती. ते दोन्ही पराक्रम या सामन्यात गाजवले गेले. उलटपक्षी इंग्लंडकडून झळकावली गेली दोनच शतके; पण शेवटच्या दोन दिवसांत ज्या नाट्यमय घटना घडल्या आणि त्यातून निकालाची जी परिणती झाली ती डोळ्यात अंजन घालणारी होती. गचाळ क्षेत्ररक्षण हा यातील सर्वात कळीचा मुद्दा.
2024-25 च्या ऑस्ट्रेलिया दौर्यातदेखील यशस्वी जैस्वालने जे खराब क्षेत्ररक्षण केले होते, त्याचीच पुनरावृती यंदाच्या इंग्लंड मालिकेत पहिल्याच सामन्यात झाली. जैस्वालचे बटर फिंगर क्षेत्ररक्षण ‘जैसे थे’ आहे. त्यात काहीही सुधारणा झालेली नाही, हे यावेळी दिसून आले. अशाच बटरस्लीप फिल्डिंगचा चांगलाच अनुभव आला होता. ज्यावेळी मेलबर्नमधील कसोटीत जैस्वालने थोडे थोडके नव्हे, तर 3 झेल सोडले आणि भारताला दारुण पराभवाचा सामना करावा लागला.
भारताच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवाचे विश्लेषण विविध महत्त्वाच्या कारणांच्या आधारे करता येते. एका आकडेवारीनुसार, सचिन तेंडुलकरची कसोटी क्रिकेटमध्ये 68 अर्धशतके आहेत, तर इंग्लंडचा जो रूट 66 अर्धशतकांसह सचिनच्या त्या महानतेच्या जवळ येऊन ठेपलाय. सचिन निवृत्त झाल्यानंतर त्याची जागा पुढील शिलेदारांनी घेतली; पण सचिनची जागा स्वतः सचिनशिवाय कोणीही भरून काढू शकत नाही, हेच त्यावेळी अधोरेखित झाले.
नंतरच्या फळीत ही जागा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी घेतली; पण अपेक्षांना ते खरे उतरू शकले नाहीत. यातील एका खेळाडूला मानसन्मान समोर ठेवून आपण आणखी खेळू शकणार नाही, हे स्वतःच्या मनावर बिंबवून घ्यावे लागले; तर एका खेळाडूला अर्ध्या मालिकेतून खेळून निवृत्ती जाहीर करण्याच्या इराद्यांना नकारघंटा मिळाल्यानंतर त्यालाही निवृत्तीचा निर्णय जाहीर करणे भाग होते. त्यानंतर विराट, रोहित बाहेर गेले आणि शुभमन गिल, यशस्वी जैस्वालसारखे नवे मोहरे संघात आले. करुण नायरला 8 वर्षांनंतर पुनरागमन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे विशेष अपेक्षा होत्या; पण अपवाद वगळता निराशा पदरी आली आणि संघाने जे पहिल्या तीन दिवसांत मिळवले होते ते सर्व उरल्या वेळेत घालवले.
या पराभवाची खरे तर अनेक कारणे आहेत. भारताच्या फलंदाजांची वरची फळी दर्जेदार गोलंदाजीसमोर अपयशी ठरली. सुरुवातीच्या स्विंग आणि बाऊन्सचा सामना करण्यात अपयश आले. चुकीच्या शॉट निवडींमुळे अडचणी वाढल्या. काही फलंदाजांनी चांगली सुरुवात केली; पण ती मोठ्या खेळीत रूपांतर करू शकले नाहीत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारख्या प्रमुख खेळाडूंवर संघ फारसा अवलंबून असल्याचे या मालिकेत दिसून आले. ते दोघे बाहेर पडले आणि त्यानंतर मधली फळी कशी ढेपाळू शकते हे दिसून आले. पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा संघ गडगडत राहिला.
जे फलंदाजीत झाले तेच गोलंदाजीतही झाले. आपली गोलंदाजी सर्वस्वी बुमराहवर अवलंबून आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले. हेडिंग्ले कसोटीत बुमराह अपेक्षित प्रभाव दाखवू शकला नाही आणि पूर्ण गोलंदाजी आघाडी कोसळली. भारतीय गोलंदाज सुरुवातीच्या षटकांत बळी घेण्यात अपयशी ठरले, ज्यामुळे प्रतिस्पर्ध्यांनी मजबूत भागीदार्या केल्या हेदेखील दिसून आले. अनुकूल परिस्थिती असूनही, गोलंदाज सातत्याने योग्य ओळ आणि लांबी राखण्यात अपयशी ठरले. त्याचा भारताला फटका बसत राहिला.
भारताचे बचावात्मक क्षेत्ररक्षणदेखील संघाला मारक ठरले. त्यात गचाळ क्षेत्ररक्षणाने आणखी भर पडली. काही शंकास्पद फिल्ड सेटिंगमुळे सोप्या धावा दिल्या गेल्या आणि प्रतिस्पर्ध्यावर दबाव कमी होत गेला. रणनीतीतील चुकाही कारणीभूत ठरल्या. खेळपट्टीच्या परिस्थितीला अनुकूल असलेला गोलंदाज किंवा अष्टपैलू खेळाडू निवडला गेला नाही. काही विशेष फिरकीपटू किंवा वेगवान गोलंदाजांना संधी न दिल्याने तोटा झाला. खेळपट्टीच्या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यात आणि प्रतिस्पर्ध्याच्या रणनीतीला प्रतिसाद देण्यात अपयश आले. झेल सोडणे आणि धावबाद करण्याच्या संधी गमावल्याने प्रतिस्पर्ध्याला महत्त्वाच्या संधी मिळाल्या. सरासरीपेक्षा कमी दर्जाचे क्षेत्ररक्षण केल्यामुळे सोप्या धावा दिल्या गेल्या. काही नवोदित किंवा कमी अनुभवी खेळाडूंना उच्चस्तरावरील रणनीतींचा सामना करण्यात अडचण आली.
आता ही मालिका पुढे सरकत असताना खेळपट्टीच्या परिस्थितीनुसार आणि प्रतिस्पर्ध्यांच्या ताकदी-उणिवांच्या आधारावर खेळाडूंची निवड करणे; गोलंदाजी आणि फलंदाजीतील विशिष्ट त्रुटींचा विचार करून सुधारणा करणे, ग्राऊंड फिल्डिंगवर जास्त भर देणे यावर संघाला लक्ष केंद्रित करावे लागेल. भारताच्या पहिल्या कसोटीतील पराभवाने संघासाठी एक इशारा दिला आहे, जी भविष्यातील सामन्यांमध्ये अधिक अनुकूलता, प्रभावी रणनीती आणि अंमलबजावणीची आवश्यकता दर्शवते. या परिस्थितीत बदल करावाच लागेल. तसे झाले तरच संघाचा या मालिकेत निभाव लागेल; अन्यथा ‘शोले’मधील गब्बरचा डायलॉग तयार असेल... जो छातीठोकपणे विचारेल... ‘कितने आदमी थे?’