

नवी दिल्ली : येथे शनिवारी झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या उपांत्य दिवशी, उंच उडीत कांस्यपदक मिळाल्यानंतर प्रवीण कुमारला निराशा लपवता आली नाही. दुसरीकडे, क्लब थ्रोमध्ये आपले विजेतेपद राखण्यात अपयशी ठरलेल्या आणि रौप्यपदकावर समाधान मानाव्या लागलेल्या एकता भ्यानने पदकाची परंपरा कायम राखली.
भारताने या दिवशी एक रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली. यामुळे भारताची एकूण पदकसंख्या 18 (6 सुवर्ण, 7 रौप्य, 5 कांस्य) झाली आहे. स्पर्धेचा एक दिवस शिल्लक असताना, जागतिक स्पर्धेतील ही भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी, 2024 मध्ये जपानमधील कोबे येथे झालेल्या स्पर्धेत भारताने 17 पदके (6 सुवर्ण, 5 रौप्य, 6 कांस्य) जिंकली होती. ब्राझील 37 पदकांसह (12 सुवर्ण, 18 रौप्य, 7 कांस्य) पदकतालिकेत अव्वल स्थानी कायम आहे.
दिवसातील भारताचे तिसरे पदक पुरुषांच्या गोळाफेक एफ 57 प्रकारात मिळाले. 42 वर्षीय लष्करी जवान सोमन राणा यांनी 14.69 मीटरच्या या हंगामातील सर्वोत्तम कामगिरीसह कांस्यपदक पटकावले. हँग्झू आशियाई क्रीडा स्पर्धेतील या रौप्यपदक विजेत्याने आपल्या चौथ्या प्रयत्नात ही सर्वोत्तम कामगिरी नोंदवली.
पॅरिस पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि पुरुषांच्या टी 64 उंच उडी प्रकारात सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा प्रवीण कुमार, 2.00 मीटरची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी नोंदवूनही तिसर्या स्थानी राहिला. उझबेकिस्तानच्या 2018 आशियाई पॅरा गेम्स सुवर्णपदक विजेत्या तेमुरबेक गियाझोव्हने 2.03 मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले. ग्रेट ब्रिटनच्या जोनाथन ब्रूम-एडवर्डस्ने 2.00 मीटरच्या कामगिरीसह रौप्यपदक पटकावले. 37 वर्षीय ब्रिटिश खेळाडूने पहिल्याच प्रयत्नात ही उंची यशस्वीपणे पार केल्याने तो प्रवीणच्या पुढे राहिला, तर प्रवीणला यासाठी दोन प्रयत्न करावे लागले.
प्रवीण आपल्या इव्हेंटदरम्यान वेदनेने त्रस्त असल्याचे दिसत होते. तो आपला रन-अप छोटा घेत होता आणि प्रत्येक प्रयत्नानंतर त्याच्या चेहर्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. त्याने 1.97 मीटरची उंची सहज पार केली; परंतु 2.00 मीटरचा अडथळा पार करताना तो पहिल्या प्रयत्नात अयशस्वी ठरला. त्यानंतर त्याने 2.03 मीटरचे तिन्ही प्रयत्न वाया घालवले. गेल्या 10-12 दिवसांपासून मला कमरेच्या दुखापतीने ग्रासले आहे, त्यामुळेच मी माझा रन-अप छोटा केला, असे 22 वर्षीय प्रवीणने सांगितले.