World Cup Qualifiers 2023 : झिम्बाब्वेचा दुसर्‍या क्रमांकाचा मोठा विजय

World Cup Qualifiers 2023 : झिम्बाब्वेचा दुसर्‍या क्रमांकाचा मोठा विजय

Published on

हरारे, वृत्तसंस्था : आयसीसी वर्ल्डकप पात्रता स्पर्धेत झिम्बाब्वेने दोन वेळच्या वर्ल्डकप विजेत्या वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवल्यानंतर यजमानांनी आज पुन्हा वादळी खेळी केली. झिम्बाब्वेने 6 बाद 408 धावा केल्या. वन-डे क्रिकेटमधील ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेचा संघ गोंधळला. त्यांनी पटापट विकेट टाकल्या अन् 104 धावांत संघ तंबूत परतला. झिम्बाब्वेने 304 धावांनी विजय मिळवला. वन-डे क्रिकेटमधील हा दुसरा सर्वात मोठा विजय आहे.

'अ' गटात आतापर्यंत तिन्ही सामने जिंकून झिम्बाब्वेने अव्वल स्थान पटकावले आहे आणि सुपर सिक्समधील स्थानही निश्चित केले आहे. त्यांची ही घोडदौड अमेरिकेविरुद्धच्या सामन्यातही कायम दिसली. वन-डे क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विक्रम त्यांनी आज केला. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात त्यांनी चारशेपार धावा उभ्या केल्या.

अमेरिकेच्या नवख्या संघासमोर जॉयलॉर्ड गुम्बी आणि इनोसेंट काईया (32) यांनी संघाला चांगली सुरुवात करून देताना पहिल्या विकेटसाठी 56 धावा जोडल्या. जॉयलॉर्ड व कर्णधार सीन विलियम्सन यांनी दुसर्‍या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी करताना अमेरिकेच्या गोलंदाजांना बेक्कार कुटले. जॉयलॉर्ड 78 धावांवर माघारी परतल्यानंतर विलियम्सन आणि फॉर्मात असलेल्या सिकंदर रझाची बॅट तळपली. रझाने 27 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 48 धावा कुटल्या. रायन बर्लने 16 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकारांसह 47 धावांची आतषबाजी केली. सीन द्विशतक झळकावेल असे वाटत होते; परंतु तो 101 चेंडूंत 21 चौकार व 5 षटकारांसह 174 धावांवर बाद झाला.

या आव्हानाचा पाठलाग करणार्‍या अमेरिकेच्या स्टिव्हन टेलर आणि सुशांत मोदानी या दोन्ही सलामीवीरांना रिचर्ड एनगारावाने माघारी पाठवले. त्यानंतर ब्रॅड इव्हान्स व सिकंदर रझा यांनी प्रत्येकी एक धक्का दिला. त्यात दोन फलंदाज रनआऊट झाल्याने अमेरिकेची अवस्था 6 बाद 45 अशी झाली होती. अभिषेक पराडकर ( 24) आणि जेस्सी सिंग (21) यांनी काही काळ संघर्ष केला. अमेरिकेचा संघ 104 धावांत तंबूत पाठवून झिम्बाब्वेने 304 धावांनी विजय मिळवला.

भारताचा विक्रम बचावला

भारतीय संघाने 2023 च्या सुरुवातीला श्रीलंकेवर 317 धावांनी दणदणीत विजय मिळवला होता आणि वन-डे क्रिकेटमधील हा सर्वात मोठा विजय ठरला होता. न्यूझीलंडने 2008 मध्ये आयर्लंडवर 209 धावांनी विजय मिळवला होता आणि आज तो विक्रम झिम्बाब्वेने तोडला .

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news