पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना रविवार, १९ नाेव्हेंबर राेजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा ६ विकेट्सने पराभव करत भारताचे स्वप्नभंग केले. कांगारूंनी सहाव्यांदा विश्वचषक आपल्या नावावर केला. भारताच्या पराभवावर माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी अआपले मत व्यक्त केले तसेच त्यांनी टीम इंडियाला सल्लाही दिला आहे. (World Cup 2023)
कपिल देव एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, "खेळाडूंनी जे झाल ते विसरुन जावे. हा काही असा धक्का नाही की यामध्ये तुम्ही तुमचं आयुष्य घालवावे. खेळाडूंना पुढे जावे लागेल. आता तुमच्या पुढच्या दिवसाचे नियोजन करावे लागेल. भूतकाळात झालेली गोष्ट आपण पूर्ववत करू शकत नाही; परंतु कठोर परिश्रम करत राहीले पाहिजे. पराभव झाल्यानंतर कोणीही काहीही बोलु शकतो; पण जिंकल्यावर सर्व संपत. भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत उत्कृष्ट खेळलाचे प्रदर्शन केले; पण ते अंतिम सामना जिंकू शकले नाहीत. पण जे चुकांमधून काहीतरी शिकताे तोच खरा खेळाडू"
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्याला कपिल देव यांना आमंत्रित केले नव्हते. सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारताचे माजी कर्णधार कपिल देव म्हणत आहेत की, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड कप फायनल पाहण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते. या व्हिडिओवर सोशल मीडिया यूजर्स संमिश्र प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त करत आहेत. भारत-ऑस्ट्रेलिया फायनलसाठी माजी क्रिकेटपटूंसह अनेक बड्या व्यक्तींना आमंत्रित करण्यात आले होते. सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण यांच्यासह अनेक प्रसिद्ध चेहरे मैदानावर टीम इंडियाचा जयजयकार करताना दिसले; पण माजी दिग्गज कपिल देव म्हणतात की त्यांना आमंत्रित करण्यात आले नव्हते.