

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात महिला वनडे वर्ल्ड कपचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाची सलामीची फलंदाज फोएब लिचफील्ड हिने आपल्या उत्कृष्ट फलंदाजीने या सामन्यात शतक पूर्ण केले. या शतकी खेळीसह तिने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
या महत्त्वाच्या सामन्यात लिचफील्डने केवळ ७७ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. वर्ल्ड कपच्या बाद फेरीच्या सामन्यात शतक ठोकणारी ती ऑस्ट्रेलियाची तिसरी फलंदाज ठरली. वनडे वर्ल्ड कपमधील हे लिचफील्डचे पहिलेच शतक आहे.
२२ वर्ष आणि १९५ दिवसांचे वय असताना शतक झळकावणाऱ्या लिचफील्डने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. ती वर्ल्ड कपच्या बाद फेरीतील सामन्यात शतक झळकावणारी सर्वात तरुण महिला फलंदाज बनली आहे. तसेच, वर्ल्ड कपच्या बाद फेरीतील सामन्यात सर्वात जलद शतक करण्याचा विक्रमही तिने नोंदवला आहे.
लिचफील्डने या सामन्यात ९३ चेंडूंमध्ये १७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ११९ धावा ठोकल्या आणि बाद झाली. या दरम्यान तिचा स्ट्राइक रेट १२७.९६ इतका प्रभावी होता. तिच्या या अविश्वसनीय खेळीमुळे ऑस्ट्रेलिया संघाने सामन्यात अत्यंत मजबूत पकड मिळवली.
या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ नेहमीच सुस्थितीत राहिला. कर्णधार एलिसा हीली लवकर बाद झाल्यानंतर, लिचफील्ड आणि अनुभवी एलिसा पेरी यांच्या भागीदारीने संघाला दमदार पुनरागमन करून दिले. या दोघींमध्ये दुसऱ्या गड्यासाठी १५५ धावांची शतकी भागीदारी झाली.
या सामन्याबद्दल बोलायचं झाल्यास, ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये या सामन्यासाठी दोन बदल करण्यात आले आहेत, तर भारतीय संघाने आपल्या अंतिम ११ खेळाडूंमध्ये तीन बदल केले आहेत.