

पुढारी ऑनलाईन डेस्क : महिलांच्या 19 वर्षांखालील टी-20 विश्वचषकात भारतीय संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरूच आहे. टीम इंडियाने शेवटच्या साखळी सामन्यात श्रीलंकेचा 60 धावांनी पराभव करत सुपर सिक्समध्ये प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने 118 धावा केल्या. यानंतर, टीम इंडियाने आपल्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेचा 58 धावांतच ऑलआऊट केला. भारतीय गोलंदाजांच्या घातक गोलंदाजीसमोर श्रीलंकन फलंदाजांनी शरणागती पत्करली. फक्त एकाच फलंदाजाला दुहेरी धावसंख्येचा आकडा गाठता आला. या स्पर्धेत श्रीलंकेचा हा पहिलाच पराभव असून हा संघही सुपर सिक्समध्ये पोहोचला आहे. (Team India Women's U19 T20 World Cup)
श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पहिला फलंदाजी करताना भारताने सलामीवीर गोंगाडी त्रिशाच्या 49 धावांच्या जोरावर 9 विकेट्स गमावून 118 धावा केल्या. त्रिशाने कठीण परिस्थितीत संघाचा डाव सावरला. तिने 44 चेंडूंच्या खेळीत पाच चौकार आणि एक षटकार मारला. मिथिला विनोदने 16 धावांचे योगदान दिले तर जोशिता व्हीजेने 14 धावा केल्या. भारताकडून 4 फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. श्रीलंकेकडून प्रमुदी मेथसारा, लिमांसा आणि असेनी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
119 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खूपच खराब झाली. टीम इंडियाच्या शबनम शकील हिने श्रीलंकन सलामीवीर सुमुदी निसंसाला जोशिताकरवी झेलबाद केले. सुमुदीला खातेही उघडता आले नाही. यानंतर, जोशिताने श्रीलंकेची दुसरी सलामीवीर संजनाला क्लिन बोल्ड केले. संजनाला 5 धावा करता आल्या. यानंतर, श्रीलंकेच्या विकेट नियमित अंतराने पडत राहिल्या. त्यांच्या 4 फलंदाजांनी 2-2 धावा केल्या. रश्मिका शेवंडी सर्वाधिक 15 धावांचे योगदान दिले. शबनमने घातक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. तिने 4 षटकांत 9 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. तर पारुनिका आणि जोशिता यांनीही प्रत्येकी 2-2 विकेट मिळवल्या. आयुषी शुक्लाने एक विकेट घेतली.