

Virat Rohit last ODI series
पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय क्रिकेटमध्ये इंग्लंड दौऱ्यानंतर काही काळ सामना नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. विशेषतः दोन दिग्गज क्रिकेटपटू – विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या भविष्यासंदर्भातील चर्चांनी जोर धरला आहे.
दोघांनी आधीच टेस्ट आणि टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे आणि आता फक्त वनडे क्रिकेटवर लक्ष केंद्रीत आहे. सुरुवातीला असं वाटत होतं की 2027 मध्ये आफ्रिकेत होणाऱ्या वनडे विश्वचषकानंतर दोघेही निवृत्त होतील. पण आता परिस्थिती तशी दिसत नाही.
‘दैनिक जागरण’च्या बातमीनुसार ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया मालिकेनंतर विराट आणि रोहित वनडे क्रिकेटमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे. एका BCCI सूत्राच्या माहितीनुसार, जर दोघांना 2027 चा विश्वचषक गाठायचा असेल, तर त्यांना डिसेंबरमध्ये होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीत खेळावं लागेल.
याआधी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय निवड समितीने सर्व खेळाडूंना रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्याचे निर्देश दिले होते. तसेच, कोहली आणि रोहित यांनी बॉर्डर-गावस्कर मालिकेनंतर रणजी ट्रॉफीत भाग घेतला होता.
BCCI आणि निवड समितीच्या मते, सध्या भारताकडे युवा खेळाडूंची चांगली फळी उपलब्ध आहे. 2027 च्या विश्वचषकासाठी संघाची तयारी करताना, युवा खेळाडूंना संधी देणे आवश्यक आहे. त्यामुळे वरिष्ठ खेळाडूंनी बाजूला व्हावे, असा विचार होत आहे.
दोघांनीच 2024 च्या बार्बाडोसमध्ये झालेल्या T20 विश्वचषकानंतर टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याआधी मे महिन्यात टेस्टमधूनही निवृत्ती घोषित केली होती.
भारतीय संघाची पुढील वनडे मालिका ऑस्ट्रेलियात 19 ऑक्टोबरपासून सुरु होईल. ही सामने पर्थ, अॅडलेड आणि सिडनी येथे खेळवली जातील. त्यानंतर डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतात तीन वनडे सामने होतील.
2026 मध्ये भारताचा वनडे कार्यक्रम पुढीलप्रमाणे:
जानेवारी – न्यूझीलंड
जून – अफगाणिस्तान
जुलै – इंग्लंड
सप्टेंबर – वेस्ट इंडीज
ऑक्टोबर – पुन्हा न्यूझीलंड