के. एल. राहुल वर्ल्डकप खेळणार?

के. एल. राहुल वर्ल्डकप खेळणार?
Published on
Updated on

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच 'बीसीसीआय'ने भारतात होणार्‍या वर्ल्डकपसाठी 15 सदस्यीय टीम इंडियाच्या संघाला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे. याची अधिकृत घोषणा आज होण्याची शक्यता एका वृत्तसंस्थेने वर्तवली आहे. शनिवारी कँडी येथे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर वरिष्ठ निवड समितीची बैठक झाली, ज्यामध्ये वर्ल्डकप संघाची निवड करण्यात आली. 'पीटीआय'च्या वृत्तानुसार, दुखापतीशी झगडत असलेल्या के. एल. राहुलला या संघात स्थान मिळवण्यात यश आले आहे. तर संजू सॅमसनला स्थान मिळालेले नाही.

मुख्य निवडकर्ता अजित आगरकर श्रीलंकेला गेले होते आणि कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासोबत त्यांनी शनिवारी रात्री उशिरा वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची निवड केली. कँडी येथे भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप सामन्यानंतर ही बैठक झाली.

संजू सॅमसन, तिलक वर्मा यांच्याशिवाय दुखापतीतून परतलेला वेगवान गोलंदाज कृष्णा, जो सध्या आशिया कपसाठी श्रीलंकेत आहे, हेदेखील संघात स्थान मिळवण्यात अपयशी ठरले आहेत. संघाची कमान रोहित शर्माच्या हाती असेल. बॅकअप यष्टिरक्षक म्हणून इशान किशनलाही स्थान मिळाले आहे. रोहित शर्मा व्यतिरिक्त शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव हे भारतीय फलंदाजीचे नेतृत्व करतील.

निवड समितीने राहुलच्या फिटनेसवरही चर्चा केली आणि वैद्यकीय संघाच्या ग्रीन सिग्नलनंतर त्याचा संघात समावेश करण्यात आला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) अंतिम वर्ल्डकप संघ सादर करण्यासाठी 'बीसीसीआय'ला 5 सप्टेंबरची अंतिम मुदत असताना, त्यांना 4 सप्टेंबरच्या संध्याकाळी निवड समितीची बैठक घ्यायची होती; पण वैद्यकीय पथकाने के. एल. राहुलला तंदुरुस्त घोषित केल्यानंतर 'बीसीसीआय'ने एक दिवस थांबण्याऐवजी संघाची निवड केली.

वर्ल्डकपसाठी भारताचा संघ असा असण्याची शक्यता : रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, के. एल. राहुल, हार्दिक पंड्या, इशान किशन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news