Suryakumar Yadav : टी-20 कॅप्टन सूर्याला वनडे संघातून का वगळले? जाणून घ्या कारण

Suryakumar Yadav : वनडे वर्ल्डकपमध्ये सूर्याची धावांसाठी धडपड
Suryakumar Yadav
गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात सूर्यकुमार धावा काढण्यासाठी धडपडताना दिसला.File Photo

पुढारी ऑनलाईन डेस्क : Suryakumar Yadav : भारतीय संघ जुलैच्या शेवटच्या आठवड्यात श्रीलंकेच्या (IND vs SL) दौऱ्यावर जाणार आहे. तिथे संघ टी-20 आणि वनडे मालिका खेळणार आहे. दोन्हीही मालिका तीन-तीन सामन्यांच्या आहेत. बीसीसीआयने (BCCI) गुरुवारी (दि. 19) श्रीलंकेविरुद्धच्या या दौऱ्यासाठी संघ जाहीर केला.

आश्चर्यकारक बदल

अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने पुढील काही वर्षांचा विचार करून टी-20 (T20) आणि एकदिवसीय (ODI) संघांची निवड केली असून या खेळाडूंनी आगामी काळात चांगली कामगिरी केल्यास हे खेळाडू संघाचे नियमित सदस्य असतील. सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) टी-20 संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे, तर रोहित शर्मा वनडे संघाची जबाबदारी सांभाळणार आहे. मात्र, संघात बरेच बदल झाले आहेत, हे थोडे आश्चर्यकारक आहे, असे अनेकांचे मत आहे.

Suryakumar Yadav : सूर्याचा वनडेतून पत्ता कट

सूर्यकुमार यादवला टी-20 कर्णधारपद मिळाल्यानंतर त्याला वनडे संघातून वगळण्यात आले आहे. त्याला एकदिवसीय सामन्यांमध्ये भरपूर संधी देण्यात आल्या आहेत, मात्र तो अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकलेला नाही. परिणामी याच कारणास्तव निवड समितीने इतर पर्यायांचा विचार केल्याचे दिसते. सूर्या हा टी-20 च्या क्रमवारीत दुस-यास्थानी आहे. त्यामुळे आणखी एक कारण असे असू शकते की 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकापर्यंत त्याला संघाच्या कर्णधारपदी ठेवण्याची योजना आहे, जेणेकरून तो फक्त एकाच फॉरमॅटवर लक्ष केंद्रित करू शकेल.

Suryakumar Yadav : वनडे वर्ल्डकपमध्ये सूर्याची धावांसाठी धडपड

गेल्या वर्षी भारतात खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात सूर्यकुमार धावा काढण्यासाठी धडपडताना दिसला. त्याने या फॉरमॅटमध्ये 37 सामने खेळले असून 25.76 च्या सरासरीने 773 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 4 अर्धशतके आहेत. पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताला फक्त 6 एकदिवसीय सामने खेळायला मिळणार आहेत. त्याआधी सूर्यकुमार यादवला संघातून वगळण्यात आले आहे, याचा स्पष्ट अर्थ निवडकर्त्यांना इतर खेळाडूंना संधी द्यायची आहे. गोलंदाजीतही सक्षम असलेल्या अष्टपैलू खेळाडूंवर निवडकर्त्यांची नजर असल्याचे दिसत आहे.

9 वर्षांपूर्वी सुरू झाली सूर्याच्या नेतृत्वाची तयारी

गौतम गंभीर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक झाल्याझाल्या सूर्याला टी-20चे कर्णधारपद मिळाले. यावर जोरदार चर्चा झडत आहेत. मात्र, गंभीरने नऊ वर्षांपूर्वीच सूर्याला (Suryakumar Yadav) कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला होता. 2015 मध्ये जेव्हा जॅक कॅलिसने केकेआरचे उपकर्णधारपद सोडले तेव्हा गंभीरने ही जबाबदारी सूर्यकुमार यादवला देण्याचा निर्णय घेतला होता. गंभीरने त्या निर्णयाची पुनरावृत्ती केली आहे. टीम इंडियाचा हेड कोच होताच त्याने भारतीय टी-20 संघाच्या कर्णधार पदासाठी सूर्याला पसंती दिली. रोहितच्या निवृत्तीनंतर संघाचे नेतृत्व करण्यात सूर्या कसा योग्य आहे, हे त्याने निवड समितीला पटवून दिले. त्यामुळे समितीनेही गंभीरच्या मताची दखल घेतली आणि टी-20 संघाच्या कर्णधार पदाची माळ सूर्याच्या (Suryakumar Yadav) गळ्यात घातली. या सर्व घडामोडीनंतर भारतीय क्रिकेटमध्ये ‘गंभीर’ युगाची सुरुवात झाल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news