

sourav ganguly on mohammed shami exclusion
कोलकाता : टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी मुख्य निवडकर्ता अजित आगरकरांवर थेट निशाणा साधला आहे. मोहम्मद शमी भारतासाठी का खेळू शकत नाही, याचे कारण निवडकर्त्यांनी सांगावे, असा सवालही त्यांनी केला आहे. दरम्यान, वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळाले नाही. तरीही त्याने सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळताना त्याने चमकदार कामगिरी केली आहे. या कामगिरीच्या जोरावर त्याने देशातंर्गत क्रिकेट स्पर्धेतआपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.
मोहम्मद शमीने सैयद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमधील मागील तीन सामन्यांमध्ये 11 बळी घेऊन आपला फॉर्म दाखवून दिला. यापूर्वी त्याने रणजी स्पर्धेतही चमकदार कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी शमीला न निवडल्यामुळे आगरकर यांच्यावर टीका होत होती. आता गांगुली यांनीही शमीला संघात समाविष्ट करण्याची मागणी करत आगरकर यांना चांगलेच फैलावर घेतले आहे.
बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले, "मला खात्री आहे की निवडकर्ते (शमीच्या कामगिरीकडे) पाहत असतील. मला हेही माहीत नाही, पण मोहम्मद शमी आणि निवडकर्ते यांच्यात चर्चा होत असेलच. तुम्ही जर मला फिटनेस आणि कौशल्य याबद्दल विचाराल, तर हा तोच मोहम्मद शमी आहे ज्याला आपण ओळखतो. त्याचे कौशल्य खूप मोठे आहे. त्यामुळे तो भारतासाठी कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट का नाही खेळू शकत, याचे मला कोणतेही कारण दिसत नाही." असेही गांगुली यांनी म्हटले आहे.
2023 च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर मोहम्मद शमीला घोट्याला दुखापत झाली होती. यानंतर तो संघातून आत-बाहेर होत राहिला आहे. त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी संघात घेतले नव्हते, पण तो चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात होता. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शमीने पाच सामन्यांत नऊ बळी घेतले होते, पण त्यानंतर त्याला राष्ट्रीय संघात जागा मिळू शकलेली नाही.