

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्लीचा युवा खेळाडू प्रियांश आर्य याने मंगळवारी आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून धमाकेदार पदार्पण केले. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात सलामीला उतरलेला डावखुरा फलंदाज प्रियांशने पॉवरप्लेच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी केली. आयपीएलच्या लिलावात मूळ किंमतीपेक्षा १० पट जास्त किंमत का मिळाली, हे प्रियंशने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यातच दाखवून दिले. त्याने २३ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ४७ धावा केल्या.
प्रियांश आर्य आयपीएल २०२५ लिलावातील सर्वाधिक मागणी असलेल्या खेळाडूंपैकी एक ठरला होता. ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीवर त्याने लिलावात प्रवेश केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील चुरशीच्या लढतीत अखेरीस पंजाब किंग्सने त्याला ३.८ कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात घेतले. दिल्ली प्रीमियर लीग २०२४ मध्ये २३ वर्षीय प्रियंश आर्यने सर्वाधिक धावा करत धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळख निर्माण केली. या स्पर्धेत त्याने अवघ्या १० डावांत १९८.६९ च्या स्ट्राइक रेटने ६०८ धावा फटकावल्या.
दिल्ली प्रीमियर लीग २०२४ मध्ये दक्षिण दिल्ली स्ट्रायकर्सविरुद्धच्या सामन्यात दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सकडू खेळताना प्रियांशने एका षटकात सहा षटकार ठोकले होते. संघाने २० षटकांत ५ बाद ३०८ धावांचा विक्रम केला होता. त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत फक्त ११ टी-२० सामने खेळले आहेत.
२३ नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये प्रियांशने उत्तर प्रदेशविरुद्ध ४३ चेंडूत १०२ धावा केल्या होत्या. त्याने १० षटकार आणि पाच चौकार मारले होते. उत्तर प्रदेशच्या संघात भुवनेश्वर कुमार, शिवम मावी आणि पियुष चावलासारखे गोलंदाज होते. २०२३-२४ च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये प्रियांश दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याने सात डावांमध्ये १६६.९१ च्या स्ट्राईक रेटने २२२ धावा केल्या होत्या.
प्रियांश आर्य हा डावखुरा फलंदाज असून त्याने IPL 2025 मध्ये पंजाब किंग्सकडून पदार्पण केले आहे. दिल्लीच्या अशोक विहारमध्ये लहानाचा मोठा झालेला प्रियांशला क्रिकेटकडे वळण्यासाठी त्याच्या पालकांनी मोठी मदत केली. शिक्षक असलेल्या त्याच्या आई-वडिलांनी शिक्षण आणि खेळ यामधील समतोल राखण्यासाठी त्याला सतत प्रोत्साहन दिले. त्याला प्रशिक्षक संजय भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी मिळाली. भारद्वाज यांनीच गौतम गंभीर, अमित मिश्रा आणि जोगिंदर शर्मा यांसारख्या खेळाडूंना घडवले आहे. आर्यला गौतम गंभीरकडून मोठी प्रेरणा मिळाली आहे. लखनऊ सुपर जायंट्सचा खेळाडू आणि दिल्ली प्रीमियर लीगमधील त्याचा सहकारी आयुष बदोनी याच्याशीही त्याचे चांगले संबंध आहेत.
प्रियांश आर्यच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील १०२ धावांच्या विक्रमी खेळीमुळे आणि दिल्ली प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थान मिळवल्यामुळे त्याच्यासाठी लिलावात चुरस निर्माण झाली. त्यामुळे पंजाब किंग्सने त्याला तब्बल ३.८ कोटींना करारबद्ध केले.