

Mithun Manhas
नवी दिल्ली: दिल्लीचे माजी क्रिकेटपटू मिथुन मनहास लवकरच भारतीय क्रिकेट नियंत्रण बोर्ड (BCCI) चे पुढील अध्यक्ष होऊ शकतात. ४५ वर्षीय मनहास, ज्यांनी भारताचे आंतरराष्ट्रीय स्तरावर कधीही प्रतिनिधित्व केले नाही, ते देशातील सर्वात शक्तिशाली क्रीडा संस्थेचे प्रमुख बनणारे पहिले अनकॅप्ड क्रिकेटपटू म्हणून इतिहास रचणार आहेत.
बीसीसीआयचे नवीन पदाधिकारी २८सप्टेंबर रोजी मुंबईत होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवडले जातील. नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत रविवारी संपत आहे. अलीकडच्या काही वर्षांपासून, मंडळाने सातत्याने माजी क्रिकेटपटूंना अध्यक्षपदाची संधी दिली आहे, ज्यात सौरव गांगुली आणि रॉजर बिन्नी यांनी मन्हास यांच्या आधी ही भूमिका पार पाडली आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, मिथुन मनहास बिनविरोध अध्यक्ष म्हणून निवडले जातील. २८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या AGM मध्ये मन्हास जम्मू-काश्मीर क्रिकेट संघाचे प्रतिनिधी म्हणून सहभागी होतील. तर पंजाबकडून हरभजन सिंह आणि कर्नाटककडून माजी स्पिनर रघुराम भट्ट सहभागी होतील.
मनहास यांच्याकडे प्रशासकीय आणि क्रिकेट दोन्हीचा अनुभव आहे. त्यांनी बीसीसीआयच्या एजीएममध्ये जम्मू आणि काश्मीरचे प्रतिनिधित्व केले आहे. मैदानावर ते भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात विश्वासार्ह व्यक्तींपैकी एक मानले जात होते. १९९७-९८ मध्ये पदार्पण केलेल्या मनहास यांनी राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुली यांसारख्या दिग्गजांच्या युगात दिल्लीसाठी मधल्या फळीतील एक स्थिर फलंदाज म्हणून काम केले. तरीही, त्यांनी दिल्लीचे यशस्वी नेतृत्व केले, २००७-०८ मध्ये रणजी करंडक जिंकवून दिला आणि त्या हंगामात ५७.५६ च्या सरासरीने ९२१ धावा केल्या.
एक अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून, मनहास मुख्यतः उजव्या हाताचे फलंदाज होते, पण ते ऑफ-स्पिन गोलंदाजीही करायचे आणि कधीकधी यष्टीरक्षणही करायचे. त्यांनी १५७ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ९,७१४ धावा केल्या, ज्यात ४५.८२ च्या सरासरीने २७ शतके आणि ४९ अर्धशतके समाविष्ट आहेत. त्यांनी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स, पुणे वॉरियर्स आणि चेन्नई सुपर किंग्सकडूनही खेळले आहे.