

Who Is Aditi Hundia Ishan Kishan’s Rumoured Girlfriend: टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या ऐतिहासिक सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी करत तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने न्यूझीलंडवर एकतर्फी विजय मिळवला. या सामन्यात जसप्रीत बुमराहला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार मिळाला, तर संजू सॅमसनने महत्त्वाची धावसंख्या उभारली. त्याचबरोबर ईशान किशननेही आक्रमक फलंदाजी करत अर्धशतक झळकावले.
ईशान किशनच्या या दमदार खेळीला प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेली मॉडेल अदिती हुंडिया त्याला चीअर करताना दिसली. सामन्यानंतर भारताच्या विजयाचा आनंद साजरा करताना अदिती मैदानावरही दिसली. तिने भारतीय संघातील खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत आनंद साजरा केला. ईशान किशन भारतीय ध्वज खांद्यावर घेत मैदानावर फिरत असताना अदितीने त्याला मिठी मारल्याचेही दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले. या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
अदिती हुंडिया अंतिम सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये भारतीय संघाच्या खेळाडूंच्या कुटुंबीयांसोबत बसलेली दिसली. तिच्या शेजारी भारतीय फलंदाज अभिषेक शर्माची बहीण कोमल शर्मा देखील बसलेली दिसत होती. दोघी मिळून भारतीय संघाला प्रोत्साहन देताना दिसल्या.
भारताचा विजय निश्चित झाल्यानंतर अदिती मैदानावर आली आणि इतर खेळाडूंच्या पत्नी व मैत्रिणींसह आनंद साजरा केला. त्या वेळी तिने कर्णधार सूर्यकुमार यादव याचेही अभिनंदन केले आणि नंतर ईशान किशनला मिठी मारली. या क्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत.
अदिती हुंडिया ही मॉडेल, मिस इंडिया फायनलिस्ट आणि उद्योजिका आहे. तिचे शालेय शिक्षण जयपूरमधील इंडिया इंटरनॅशनल स्कूलमध्ये झाले, तर उच्च शिक्षणासाठी तिने सेंट झेवियर्स कॉलेज, जयपूर मधून झाले. कॉलेजमध्ये असतानाच तिने फॅशन शो आणि स्थानिक सौंदर्यस्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आणि याच काळात तिच्या मॉडेलिंग करिअरची सुरुवात झाली.
२०१७ मध्ये तिने ‘मिस इंडिया’ स्पर्धेत भाग घेतला आणि अंतिम फेरीपर्यंत पोहोचली. त्यानंतर २०१८ मध्ये ती ‘मिस दिवा सुप्रानॅशनल’ स्पर्धेची विजेती ठरली. या विजयानंतर तिने भारताचे प्रतिनिधित्व ‘मिस सुप्रानॅशनल २०१९’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत केले.
सौंदर्यस्पर्धांमधील यशानंतर अदितीने फॅशन मॉडेलिंग क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. काही वर्षांपूर्वी तिने स्वतःचा फॅशन आणि मेकअप ब्रँड सुरू केला असून सध्या त्यावर काम करत आहे. सोशल मीडियावरही ती लोकप्रिय आहे. इन्स्टाग्रामवर तिचे साडेतीन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत आणि ती कंटेंट क्रिएटर व इन्फ्लुएन्सर म्हणूनही ओळखली जाते.
गेल्या काही वर्षांपासून अदिती हुंडिया आणि भारतीय क्रिकेटपटू ईशान किशनचे नाव एकत्र जोडले जात आहे. दोघांना अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र पाहिल्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल चर्चा रंगत असते. मात्र दोघांनीही याबाबत अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये अदितीची उपस्थिती आणि विजय साजरा करतानाचे क्षण पाहून सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाली आहे.