

पुढारी ऑनलाईन डेस्क : गाबा कसोटीनंतर भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin retirement) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. गाबा कसोटी सामन्यानंतर अचानक केलेल्या घोषणेमुळे चाहत्यांना धक्का बसला. अचानक निवृत्तीचा निर्णय का घेतला? यावर अश्विनने खुलासा केला आहे.
अश्विनने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले, "मी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) साठी खेळणार आहे. मी जितका वेळ खेळू शकतो तितका वेळ खेळण्याचा प्रयत्न केला आणि आकांक्षा बाळगली तर आश्चर्य वाटायला नको. मला वाटत नाही की अश्विनची क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द संपली आहे. मला वाटते की कदाचित भारतीय क्रिकेटपटू अश्विनची वेळ आली आहे. हीच तीच योग्य वेळ आहे."
तू जाहीर केलेला निवृत्तीचा एक अवघड निर्णय होता का? असे विचारले असता अश्विन म्हणाला की, असे नाही. हे अनेक लोकांसाठी भावनिक आहे. ते भावनिक असेल. पण माझ्यासाठी ही खूप मोठी दिलासादायी आणि समाधानाची बाब आहे. माझ्या निवृत्तीचा विचार माझ्या मनात अनेक दिवसांपासून सुरु होता. पण हा निर्णय अगदी सहजपणे घेतला. मला त्याबद्दल कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जाणीव झाली आणि पाचव्या दिवशी निर्णय जाहीर केला, अशी भावना अश्विनने व्यक्त केली.
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर रविचंद्रन अश्विन अवघ्या २४ तासांत चेन्नईत मायदेशी परतला. यावेळी विमानतळावर त्याचे चाहते आणि त्याच्या कुटुंबियांनी त्याचे जोरदार स्वागत केले.
आर. अश्विनच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या फलंदाजांमध्ये तो सातव्या क्रमांकावर आहे. १०६ कसोटीत ५३७ विकेट त्याच्या नावावर आहेत. ५९ धावांमध्ये सात बळी ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी ठरली होता. कसोटीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या भारतीयांमध्ये अश्विन हा अनिल कुंबळेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. कुंबळेच्या नावावर ६१९ बळी आहेत.